दोन डमी दहशतवाद्यांना, पकडण्यात यंत्रणांना यश
प्रतिनिधी/ पणजी
गोवा पोलीस व केंद्रीय सुरक्षा गार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने गोव्यात काल सोमवारपासून दहशतवाद विरोधी मॉक ड्रील सुरु झाले. सोमवारी पर्वरी येथील विधानसभा व मिरामार येथील एका हायस्कूल इमारतीवर होणाऱया घातपाताचा शोध लावण्यात पोलीस यशस्वी झाले.
मॉक ड्रील म्हणजे आतंकवाद्यांनी एखाद्यावेळी हल्ला केला तर त्यांना समोरे कसे जायचे, याची ती एक प्रकारे तालीम असते. सुरक्षा यंत्रणेला जागृत ठेवण्यासाठी केलेला तो एक प्रयोग असतो, अशी माहिती पोलीस अधिकाऱयांनी दिली.
सतर्कता, सज्जतेसाठी मॉक ड्रील आवश्यक
गोव्यातील सुरक्षा आणि शांती अबाधित राखण्यासाठी पोलीस खात्याकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. दहशतवादापासून सुरक्षा यंत्रणा मजबूत करण्यासाठी गोवा पोलीस खात्याचे पोलीस महासंचालक मुकेश कुमार मिणा यांना नोव्हेंबर महिन्यात केंद्रीय सुरक्षा गार्डचे मेजर जनरल रानडे भेटले होते. गोव्यात डिसेंबर महिना हा महत्वाचा असतो. मोठय़ाप्रमाणात पर्यटक येत असतात. पर्यटकाच्या वेशात एखादा अतंकवादी गोव्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे राज्यातील सुरुक्षा यंत्रणा सतर्क व सज्ज असणे फार महत्वाचे आहे. म्हणूनच मॉक ड्रीलचे आयोजन करण्यात आले आहे.
डमी दहशतवादय़ांना पकडण्यात यश
मॉक ड्रील करीत असताना ज्या व्यक्तीची पोलिसांना ओळखही नसते अशा व्यक्तींना काही ठिकाणांवर आतंकवादी बनवून पाठविले जाते. त्या व्यक्तींना पोलिसांनी पोलिसांनी एका ठराविक वेळेत शोधून काढणे गरजेचे असते. सोमवारी विधानसभा तसेच मिरामार येथे एका ठिकाणावर मॉकड्रील मधील आतंकवाद्यानी हल्ले करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना ठरलेल्या वेळेत शोधून काढले आहे.
गोवा पोलीस खात्याचे उत्तर गोवा व दक्षिण विभाग पोलीस तसेच एटीएस विभाग मॉक ड्रील मोहिमेत सहभागी झाले आहेत. काल सोमवार, आज मंगळवार व उद्या बुधवार असे तीन दिवस मॉक ड्रील होणार आहे. मॉक ड्रीलमुळे राज्यात काही महत्वाच्या ठिकाणी वाहतूक खोळंबा झाला. अनेक वाहनचालकांना रस्त्यात ताटकळत रहावे लागले.