विज्ञान विषय शिक्षकांची बालिका आदर्श विद्यालयात बैठक
प्रतिनिधी / बेळगाव
बालिका आदर्श विद्यालयात शहर विज्ञान शिक्षकांची बैठक पार पडली. दहावीच्या परीक्षेत विज्ञान विषयाचा 100 टक्के निकाल लावण्यासाठी प्रश्नोत्तराच्या संचाचे प्रकाशन आणि वितरण करण्याचा कार्यक्रम पार पडला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एन. ओ. डोणकरी होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव शहर गटशिक्षणाधिकारी रवि बजंत्री, कर्नाटक राज्य माध्यमिक शिक्षक संघाचे बेळगाव जिल्हाध्यक्ष एकनाथ पाटील, विज्ञान विषय शिक्षक संघाचे अध्यक्ष एस. एन. जोशी, समन्वयक अधिकारी सुरेश कळ्ळेकर, सचिव सुरेश भातकांडे उपस्थित होते.
प्रारंभी विद्यार्थिनींनी ईशस्तवन आणि स्वागतगीत म्हटले. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष एकनाथ पाटील म्हणाले, गटशिक्षणाधिकारी रवि बजंत्री हे दहावीच्या निकाल वाढीसाठी वेगवेगळे उपक्रम राबवित आहेत. आपण सर्वांनी त्यांच्या कार्यास सहकार्य करून आपापल्या शाळेचा निकाल अत्युत्तम लागण्यासाठी प्रयत्न करूया, असे मत व्यक्त केले.
गटशिक्षणाधिकारी रवि बजंत्री यांनी, राज्यात आपल्या जिल्हय़ाचा दहावीचा निकाल उंचावण्यासाठी प्रयत्न करूया. विज्ञान विषय शिक्षकांचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत. तुम्ही केलेला प्रश्नोत्तर संच हा आदर्श ठरेल. तसेच तुमचा आदर्श इतर शिक्षकांनी घ्यावा, असे आवाहन केले.
एन. ओ. डोणकरी म्हणाले, विद्यार्थ्यांच्या कमकुवत बाबींकडे लक्ष देऊन त्या निकालात काढल्यास निकाल नक्की सुधारेल. गटशिक्षणाधिकाऱयांच्या हस्ते प्रश्नोत्तर संचाचे प्रकाशन करून वितरण करण्यात आले. यावेळी सर्व शाळांचे विज्ञान विषय शिक्षक उपस्थित होते. सूत्रसंचालन शिक्षिका कीर्ती चिंचणीकर यांनी केले. सुरेश कळ्ळेकर यांनी आभार मानले.