शिक्षणमंत्री सुरेशकुमार यांची घोषणा
बेंगळूर : राज्यात कोरोना परिस्थितीतही दहावीची परीक्षा घेतली जात आहे. सोमवारी गणित, विज्ञान, समाज या विषयांचा एकत्रित पेपर झाला आहे. तर गुरुवार दि. 22 रोजी भाषा विषयांचा पेपर होणार आहे. या परीक्षेचा निकाल 10 ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात येईल, अशी घोषणा प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांनी केली आहे. येथे पत्रकारांशी ते बोलत होते. यंदा दहावी परीक्षेत बहुपर्यायी स्वरुपातील प्रश्नपत्रिका असून योग्य उत्तरे ओएमआर शिटमध्ये नमूद करावी लागत आहेत. त्यामुळे मूल्यमापनाला अधिक कालावधी लागणार नाही. त्यामुळे 10 ऑगस्ट रोजी दहावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे, असे ते म्हणाले. कोरोना संसर्गामुळे यंदा दहावी परीक्षा पद्धतीत बदल करण्यात आला असून दोनच दिवस परीक्षा घेतली जात आहे. प्रश्नपत्रिकेचे स्वरुपही बदलण्यात आले आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना अनुकूल झाले आहे, असेही त्यांनी सांगितले.