परीक्षेच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारीची गरज : जूनमध्ये दहावीची होणार परीक्षा
प्रतिनिधी / बेळगाव
शिक्षण विभागाकडून गतवर्षापासून श्रेणीनिहाय निकाल जाहीर केला जात आहे. त्यानुसार बेळगाव शैक्षणिक जिल्हा क श्रेणीत आहे. याबरोबरच बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ातील सर्वच शैक्षणिक तालुके ब आणि क या श्रेणीत असून गतवर्षी निकालात झालेली घसरण भरून काढण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. जून महिन्यात दहावीची परीक्षा होणार असून परीक्षेच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी करणे आवश्यक आहे.
गतवर्षी बेळगाव शैक्षणिक जिल्हा राज्यात 31 व्या क्रमांकावर होता तर चिकोडी शैक्षणिक जिल्हा 28 व्या स्थानावर होता. यामुळे शिक्षण खात्याने तयार केलेल्या अहवालानुसार तालुकानिहाय निकाल वाढविणे गरजेचे आहे. गतवर्षी जिल्हय़ात बैलहेंगल तालुका प्रथम क्रमांकावर तर खानापूर तालुका 7 व्या क्रमांकावर होता.
बेळगाव शहर निकालात पाठीमागेच
2019-2020 या शैक्षणिक वर्षात बेळगाव शहराचा निकाल 56.68 टक्के इतका लागला होता. त्यानुसार तालुका 5 व्या स्थानावर होता. शहरदेखील क श्रेणीत होते. त्या तुलनेत बैलहेंगल तालुक्याने निकालात आपले स्थान 76.16 टक्क्यांनी राखत ब श्रेणी मिळविली होती. अभ्यासक्रमात यंदा 30 टक्क्यांनी कपात झाली असून त्यानुसार शाळास्तरावर अभ्यासक्रम पूर्ण करत पूर्वतयारी करून घेणे अपेक्षित आहे. त्यावरच यंदाच्या निकालाची टक्केवारी ठरणार आहे.