प्रतिनिधी / पणजी
गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची (गोवा बोर्ड) सर्वसाधारण सभा आज शनिवार दि. 29 मे रोजी सकाळी 11 वा. व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली असून त्यात दहावीच्या निकालाबाबत अंतिम निर्णय होणार आहे.
गोवा बोर्डाची दहावीची परीक्षा राज्य सरकारने रद्द केली असून आता शाळेतील अंतर्गत मुल्यमापनावर दहावी विद्यार्थ्यांचा निकाल ठरवला जाणार आहे. तो निकाल कसा तयार करायचा व तो केव्हा जाहीर करायचा याबाबत निर्णय होणार आहे. शाळांनी दहावी विद्यार्थ्यांचे जे मुल्यमापन केले आहे त्यावर आधारित हा निकाल तयार करण्यात येणार आहे. बोर्डाच्या परीक्षा समितीने स्वतंत्र बैठक घेवून दहावी विद्यार्थ्यांना गुण कसे द्यायचे याबाबतची योजना निश्चित केली असून ती बोर्डाच्या सर्वसाधारण बैठकीत मांडण्यात येणार आहे. परीक्षा समितीने त्या योजनेस मान्यता दिली आहे. बोर्डाच्या सर्वसाधारण सभेत त्यावर चर्चा होणार असून तेथे ती मान्य झालयानंतरच त्याची अंमलबजावणी होणार आहे. दहावी गुण योजनेस सर्वसाधारण सभेने मंजुरी दिल्यानंतर तालुका निहाय शाळा प्रमुखांची बैठक, कार्यशाळा, वेबिनार घेवून योजनेची माहिती देण्यात येणार आहे. हे सर्व झाल्यानंतरच दहावी निकालाची कार्यवाही होणार असल्याचे सांगण्यात आले.