गोळवलीतील राहत्या घरात घेतला गळफास
वार्ताहर/ संगमेश्वर
संगमेश्वरजवळच्या गोळवली आमकरवाडी येथील दहावी इयत्तेत शिकणाऱया विद्यार्थिनीने राहत्या घरात नायलॉन साडीच्या सहाय्याने पंख्याला गळफास घेवून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. रविवारी सकाळी ही घटना घडली. तिने आत्महत्या का केली, याचे कारण अद्यापही समजू शकले नाही. मात्र गेल्या 10 दिवसात दोन शाळकरी मुलींनी आत्महत्या केल्याने संगमेश्वर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
तन्वी श्रीकांत आमकर (16) असे आत्महत्या केलेल्या शालेय विद्यार्थिनीचे नाव आहे. तन्वी ही दहावीची विद्यार्थिनी होती. ती घरामध्ये रविवारी सकाळच्या दरम्यान अभ्यास करीत होती. शेतीची कामे सुरु झाल्याने तिची आई सकाळी लवकर कामाला निघाली होती. परंतु पाणी येणार होते. त्यामुळे घरात थांबली होती, मात्र तन्वीने आईला तू कामावर जा, मी पाणी भरते, असे सांगितल्याने ती कामावर गेली होती. सकाळच्या दरम्यान तन्वी घरामध्ये अभ्यास करत होती. मात्र अभ्यास करताना तिने टोकाची भूमिका घेत घरातील पॅनला नायलॉनच्या साडीने गळफास घेतला. 8 च्या सुमारास आई घरात आली असता तन्वी गळफास लावलेल्या स्थितीत दिसली. त्यानंतर घाबरलेल्या तिच्या आईने आरडाओरड करुन ही बाब शेजाऱयांना सांगितली. त्यानंतर गावचे पोलीस पाटील अप्पा पाध्ये आणि ग्रामस्थांनी तिला खाली उतरवून रुग्णालयात नेले, मात्र ती त्यापूर्वी मृत झाली होती. मात्र तिने आत्महत्या का केली, त्याचे कारण अद्यापही समजू शकले नाही. या घटनेचा तपास संगमेश्वर पोलीस करत आहेत.