गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 75 हजारांनी विद्यार्थी संख्येत वाढ : येत्या काही वर्षांत हा आकडा वाढण्याची शक्यता : तुलनेत कोकण बोर्डाकडील विद्यार्थी संख्येत वाढ कमी : इंग्रजी माध्यमाच्या मुलांचीही संख्या वाढतेय
अजय कांडर / कणकवली:
मराठी भाषेचा संकोच होत असून इंग्रजी भाषेचा प्रभाव वाढत आहे. त्यामुळे मराठीतून शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्यांच्या संख्येत घट होत आहे, असा आरोप केला जात आहे. मात्र, हा समज खोटा ठरावा, याचा प्रत्यय दहावीची परीक्षा मराठी माध्यमातून देणाऱया विद्यार्थ्यांनी दिला आहे. यावर्षी राज्यात मराठी माध्यमातून दहावीची परीक्षा देणाऱया विद्यार्थ्यांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. तब्बल 75 हजारांनी यात वाढ झाली आहे. कोकण बोर्डातून यावर्षी मराठी माध्यमातून दहावी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 151 विद्यार्थ्यांची वाढ झाल्याची माहिती कोकण बोर्डाच्या एसएससी परीक्षा विभागाने दिली.
इंग्रजी माध्यमातूनच आपल्या पाल्यांनी शिक्षण घ्यायला हवे, असा आग्रह काही पालकांचा अलिकडल्या काळात वाढत असताना मराठी माध्यमातून परीक्षा देण्याऱया विद्यार्थ्यांच्या संख्येतही वाढ होत आहे हा बदल अधिक महत्वाचा मानला जात आहे. खरं तर इंग्रजी माध्यमातूनच शिक्षण घेतले, तरच आपली शैक्षणिक प्रगती होते, अशी मानसिकता विद्यार्थ्यांची बनविली जात आहे. यात सर्व स्तरातील पालकांचा प्रमुख सहभाग असतो, असा आरोप मध्यंतरी मराठी भाषा अभ्यासकांनीच केला होता. इंग्रजी माध्यमांच्या शाळांची संख्या वाढल्याने मराठीची पीछेहाट होत असल्याची चर्चा सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर दहावीत मराठी माध्यमातून परीक्षा देणाऱया विद्यार्थ्यांमध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत 75 हजाराने वाढ झाली ही आनंदाची बातमी असून पुढील काही वर्षात हा आकडा अधिक वाढेल, असा अंदाज वर्तविला जात आहे.
इंग्रजी माध्यमाचेही विद्यार्थी वाढले
मोठय़ा शहराबरोबरच दरवर्षी ग्रामीण भागात इंग्रजी शाळांची संख्या वाढत आहे. यात तालुकास्तरापासून अल्प नागरी वस्तीतही इंग्रजी शाळा वाढत असताना यावर्षी मराठी माध्यमातून 12 लाख 37 हजार 444 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. गेल्या वर्षी 11 लाख 91 हजार 498 विद्यार्थ्यांनी मराठी माध्यमाला प्राधान्य दिले होते. मात्र, महाराष्ट्रात विविध भाषांतून दहावी परीक्षा दिली जात असली, तरी मराठी खालोखाल इंग्रजी माध्यमातून दहावी परीक्षा देणारी विद्यार्थी संख्या आहे. यावर्षी 3 लाख 28 हजार 784, तर गेल्या वर्षी 2 लाख 82 हजार 442 विद्यार्थ्यांनी इंग्रजी माध्यमातून परीक्षा दिली होती. त्यामुळे इंग्रजी माध्यमाचेही 46 हजार 772 विद्यार्थी वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.
कोकणात मराठीपेक्षा इंग्रजीची वाढ
कोकण बोर्डातून गेल्या वर्षी मराठी माध्यमातून 29,662 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यावर्षी 29,813 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यावर्षी मराठी माध्यमातून परीक्षा देणाऱया विद्यार्थ्यांमध्ये 151 विद्यार्थ्यांची वाढ झाली आहे. इंग्रजी माध्यमातून गेल्या वर्षी 3537 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर यावर्षी 4274 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यावर्षी इंग्रजीतून परीक्षा देणाऱया विद्यार्थ्यांमध्ये 731 विद्यार्थ्यांची वाढ झाली आहे.
हिंदीमधूनही वाढ
महाराष्ट्रात हिंदी भाषेतून परीक्षा देणाऱया विद्यार्थ्यांची संख्या दरवर्षीच मराठी, इंग्रजी माध्यमातून परीक्षा देणाऱया विद्यार्थ्यांच्या संख्येच्या खालोखाल म्हणजे तीन नंबरला असते. गेल्यावर्षी हिंदी माध्यमातील विद्यार्थ्यांची संख्या 50 हजार 120 होती, ती वाढून यावर्षी 55 हजार 449 विद्यार्थ्यांनी हिंदी माध्यमातून परीक्षा दिली. गुजराती माध्यमातून 2909, कन्नडमधून 2 हजार 844, सिंधीमधून 77, तेलगूमधून 290 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
मराठीचे महत्व टिकून
राज्य शैक्षणिक मंडळाने मार्चमध्ये घेतलेल्या दहावीचा निकाल आता आताच जाहीर करण्यात आला. विद्यार्थ्यांना मराठीसह हिंदी, इंग्रजी, गुजराती कन्नड, उर्दू सिंधी, अरेबिका, देवनागरी, तेलगू या माध्यमातून परीक्षा देण्याची मुभा आहे. परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची आकडेवारी पाहिली असता, मराठी माध्यमाचे महत्व दहावीच्या परीक्षेत टिकून असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातही मराठी माध्यमांच्या तुलनेत अन्य माध्यमांच्या विद्यार्थ्यांची संख्या बरीच कमी आहे.
गेल्या वषी उर्दू माध्यमातील 88,759 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यंदा 96 हजार 629 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी उर्दू माध्यम निवडले. त्यामुळे या माध्यमातून दहावीची परीक्षा देणाऱया विद्यार्थ्यांमध्ये यावर्षी 7870 विद्यार्थी वाढले आहेत.
टक्का वाढतच राहील
शिक्षणातही मराठी भाषेचे महत्व कमी झाले, अशी चर्चा गेली काही वर्षे सुरू आहे. मात्र, आता मराठी भाषेतून शिक्षण घेतले, तर विद्यार्थ्यांच्या संवेदनशिलतेत वाढ होतानाच तो आपल्या भवतालाला अधिक जोडून राहतो हे अनेक पालकांना कळायला लागले आहे. यातूनच यावर्षी मराठी एसएससी परीक्षा देणाऱया विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली असून हा टक्का पुढे वाढतच राहील, असे मत भाषा अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.