प्रतिनिधी/ बेंगळूर
कोरोना परिस्थितीतही 19 आणि 22 जुलै रोजी राज्यात दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, शनिवारी निकाल जाहीर केला जाणार नाही, असे स्पष्टीकरण माध्यमिक शिक्षण परीक्षा मंडळाच्या संचालक सुमंगला यांनी सांगितले आहे. दहावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. याबाबत लवकरच माहिती देण्यात येईल, असे त्या म्हणाल्या. नूतन मंत्र्यांना अद्याप खातेवाटप झाले नाही. शिक्षण खात्याची जबाबदारी मिळालेले मंत्री अधिकाऱयांशी चर्चा करून निकालाची तारीख निश्चित करणार आहेत. त्यामुळे येत्या दोन दिवसांत दहावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.