आमदार दयानंद सोपटे यांचे मत
पेडणे / प्रतिनिधी
मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आणि शालान्त मंडळाने परीक्षा घेण्याचा जो निर्णय घेतला त्या निर्णयाचे आपण स्वागत करत असून सर्व विरोधी आमदार , नेते, नागरिक यांनी केवळ विरोधासाठी विरोध करून मुलांच्या भवितव्याशी खेळ खेळण्याचा प्रयत्न करू नये. उलट सर्वांनी सहकार्य करून ज्या ज्या हायस्कूलमध्ये विद्यार्थी परीक्षा देणार आहे त्या त्या ठिकाणी त्याना मास्क, सॅनिटायझर सोयी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन मांदेचे आमदार तथा पर्यटन विकास महामंडळ चेअरमेन दयानंद सोपटे यांनी आपल्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले.
विरोधी आमदार, नेते समाजामध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करतात ते योग्य नाही. प्रामुख्याने विद्यार्थ्यांच्या बाबतीत, शिक्षणाच्या बाबतीत विरोधी हवा तयार करुन वातावरण बिघडू नये. उलट विद्यार्थ्यांचे मनोबल कसे वाढणार याकडे कटाक्ष ठेवायला हवा. विरोधी नेत्यांनी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवून त्यांना मानसिक आधार देऊन त्यांना समर्थन द्यायला हवे.
यापूर्वी विद्यार्थी परीक्षा होत नसल्याने दडपणाखाली होती, मात्र ज्या दिवशी सरकारने परीक्षा घेण्याचा आणि वेळापत्रक जाहीर केल्याने विद्यार्थ्यांचा जो उत्साह वाढला, त्यात पालकामध्ये उत्साह संचारला. हि परीक्षा गरजेची हिती, वर्षभर विद्यार्थी परिश्रम घेऊन अभ्यास करतात. शिक्षक शिकवत असतात. आता परीक्षा होत असल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱयावर हास्य आणि समाधान दिसत आहे .परीक्षाच झाल्या नाहीतर हे भवितव्य अंधारमय व्हायला विलंब लागला नसता. यासाठी जे समाजामध्ये गैरसमज पसरवतात त्यांनी विचार करावा असे आवाहन आमदार दयानंद सोपटे यांनी केले .
कोरोनाचे नियम पाळूया
महामारीच्या रूपाने कोरोनाचे नियम घालून ज्या परीक्षा होणार त्याचे काटेकोरपणे पालन करुया. सुरक्षित अंतर पाळूया , परीक्षा घेताना एका वर्गात 10 ते बाराच विधार्थी सुरक्षित अंतराने बसणार आहेत असे सोपटे म्हणाले . मास्क वापरणे , आणि परीक्षा यशस्वी व्हावी असे त्यांनी म्हटले .