शिक्षणमंत्री सुरेशकुमार यांची माहिती : मंगळुरात पत्रकारांशी साधला संवाद
प्रतिनिधी / बेंगळूर
दहावी परीक्षेचे वेळापत्रक 2 दिवसात जाहीर केले जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा दहावी परीक्षेसाठी 70 टक्के अभ्यासक्रम निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे पालकांनी कोणतीही भीती बाळगण्याची आवश्यकता नाही, असे शिक्षणमंत्री सुरेशकुमार यांनी मंगळूर येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
मंत्री पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आवश्यक असणारा अभ्यासक्रम निश्चित केला आहे. गतवर्षी कोरोनामुळे शाळा सुरू करणे शक्य झाले नाही. त्यामुळे जानेवारीपासून माध्यमिक व पदवी महाविद्यालयांचे वर्ग सुरू केले आहेत. 1 ली ते 5 वीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याबाबत सरकार विचार करत आहे. याबाबत तांत्रिक सल्लागार समितीसोबत चर्चा करण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खासगी शाळा आणि पालकांच्या हिताचा विचार करून शैक्षणिक शुल्कात 30 टक्के कपात करण्यात आली आहे. यावर आक्षेप घेऊन खासगी शाळा व्यवस्थापन संघटनेने न्यायालयात धाव घेतली आहे. लवकरच शुल्क कपातीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
शाळा शुल्क समस्येवर पालक व शिक्षणसंस्थांनी परस्पर चर्चा करून निर्णय घेणे आवश्यक होते. पण, त्यांनी निर्णय न घेतल्याने शैक्षणिक शुल्कात आम्ही 30 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला होता. यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी शुल्क भरले आहे. त्यांच्या पुढील वर्षाच्या शुल्कात कपात करण्याची सूचना केली आहे, असेही मंत्री सुरेशकुमार म्हणाले.
शैक्षणिक संस्थांमधील रिक्त पदे भरणार
शैक्षणिक संस्थांमधील रिक्त पदे भरण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे मंत्री सुरेशकुमार यांनी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांचे आभार मानले आहेत. त्यानुसार पदवीपूर्व शिक्षण खात्याच्या व्याप्तीतील खासगी अनुदानित शिक्षण संस्थांमधील रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.