बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ात 6 केंद्रांवर 424 शिक्षक करणार मूल्यमापन
प्रतिनिधी/ बेळगाव
कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर जून महिन्यात होणारी पुरवणी परीक्षा सप्टेंबर 2020 मध्ये पार पडली. सदर पुरवणी परीक्षेची मूल्यमापन प्रक्रिया बुधवार दि. 7 ऑक्टोबरपासून राबविण्यात येणार आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ात एकूण 6 केंद्रांवर मूल्यमापन होणार असून एकूण 424 शिक्षक मूल्यमापन करणार आहेत. पुरवणी परीक्षार्थींची संख्या अधिक असून पेपरच्या संख्येनुसार मूल्यमापन प्रक्रिया पाच ते आठ दिवसांच्या कालावधीत पूर्ण होणार आहे.
विषयनिहाय एक याप्रमाणे सेंट पॉल्स, सेंट झेवियर्स, उषाताई गोगटे, महांतेशनगर कन्नड हायस्कूल, श्री सिद्धरामेश्वर हायस्कूल, मराठा मंडळ या केंद्रांवर मूल्यमापन करण्यात येईल. पुरवणी परीक्षेला अनुत्तीर्ण झालेल्यांमध्ये प्रामुख्याने गणित, विज्ञान व समाज विज्ञान विषयाच्या पेपरची संख्या अधिक आहे. यामुळे सर्वाधिक गणित विषयाच्या मूल्यमापनासाठी 366 शिक्षकांची मूल्यमापक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विज्ञान विषयासाठी 166, समाज विज्ञानसाठी 225, हिंदीसाठी 21, इंग्रजीसाठी 56 शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवाय प्रथम भाषा-कन्नड 26, द्वितीय भाषा-कन्नड 61, कन्नड विषय (तृतीय भाषा) 10 शिक्षक मूल्यमापनाचे काम करणार आहेत.
जिल्हानिहाय मूल्यमापन प्रक्रिया राबविताना प्रामुख्याने पेपर एका जिल्हय़ातून दुसऱया जिल्हय़ात वितरीत करण्यात येत असल्याने सदर कार्याला गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. प्रत्यक्ष मूल्यमापनाचे काम 7 ऑक्टोबरपासून सुरू होणार असले तरी मूल्यमापनाच्या अनुषंगाने प्रत्येक केंद्रावर नियुक्त करण्यात आलेल्या केंद्र प्रमुख आणि साहाय्यक केंद्र प्रमुखांचे काम सुरू झाले आहे.