प्रतिनिधी /पणजी
गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (गोवा बोर्ड) होणारी दहावी-बारावीची दुसऱया सत्रातील परीक्षा आज मंगळवार 5 एप्रिलपासून सुरू होत असून त्याची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. या परीक्षेत गणित, सायन्स अशा दोन्ही विषयांना 15 मिनिटे जादा अवधी देण्यात येणार असून दहावी-बारावी अशा दोन्ही इयत्तेच्या विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे.
कोरोनाच्या सर्व मार्गदर्शक तत्वांचे पालन सर्व परीक्षा केंद्रावर केले जाणार असून मास्कचा वापर बंधनकारक आहे. शिवाय थर्मल स्कॅनर, हँड सॅनिटायझर, सामाजिक अंतर हे निर्बंध पाळावे लागणार आहेत.
दहावीसाठी सुमारे 20594 जणांनी तर बारावीसाठी 18215 जणांनी परीक्षेकरीता नोंदणी केली आहे. दहावीची परीक्षा सकाळी 10.30 वाजता तर बारावीची परीक्षा सकाळी 9.30 वाजता सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले.
दहावी- बारावीच्या परीक्षा या प्रत्यक्ष हजेरीत अर्थात ऑफलाईन होणार असून त्या ऑनलाईन घेण्याचा प्रश्नच येत नाही आणि तो मुद्दा यापूर्वीच गोवा बोर्डाने निकालात काढला आहे. यंदापासून दोन सत्रात दोन्ही परीक्षा घेण्यात येत असून दोन्ही परीक्षांचे गुण एकत्र करूनच अंतिम निकाल लावणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.