1 ते 25 मार्चपर्यंत होणार परीक्षा
प्रतिनिधी /पणजी
दहावी-बारावीची दुसरी सत्र परीक्षा एप्रिल-मे 2022 मध्ये घेण्यात येणार असल्याची माहिती गोवा माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (गोवा बोर्ड) दिली आहे. प्रात्यक्षिक (प्रॅक्टीकल) व इतर परीक्षा प्रत्यक्ष हजेरीत घेण्यात येणार असून त्याची तयारी बोर्डातर्फे करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
चालू शैक्षणिक वर्षापासून 2021-22 मध्ये दहावी-बारावीच्या प्रथम-दुसरे सत्र अशा दोन परीक्षा घेण्याचे नवे धोरण बोर्डाने आखले असून त्याची कार्यवाही सुरू आहे. प्रथम सत्र परीक्षा झाली असून आता दुसरी सत्र परीक्षा होणार आहे.
गोवा बोर्डाने मंगळवारी जाहीर केलेल्या वेळापत्रकात दहावीची अंतिम बोर्ड प्रक्टीकल परीक्षा 1 ते 18 मार्च, तर बारावीची 1 मार्च ते 25 मार्च या कालावधीत होणार असल्याचे जाहीर केले आहे.
बोर्डाने सर्व शाळा आणि उच्च माध्यमिक शाळांना सर्व आरोग्य प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करून, परीक्षा घेतल्या जातील याची खात्री करण्याचे निर्देश दिले आहेत. संस्थेच्या प्रमुखांना परीक्षेची तारीख आणि परीक्षेच्या बॅचची संख्या किमान एक आठवडा आधी, विद्यार्थ्यांना सूचित करण्याचे निर्देश दिले आहेत.