ऑनलाईन टीम / पुणे :
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाकडून एप्रिल – मे 2021 मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 29 एप्रिल ते 20 मे 2021 दरम्यान दहावी बोर्डाची परीक्षा होण्याची शक्यता आहे. तर 23 एप्रिल ते 21 मे 2021 दरम्यान बारावीची परीक्षा होणार असल्याचे या संभाव्य वेळापत्रकात बोर्डाने जाहीर केले आहे. बोर्डाने या संदर्भात परिपत्रक जारी केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण मंडळाच्या ठरलेल्या कालावधी परीक्षा घेता आली नाही. त्यामुळे सरकारच्या परवानगीनंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडाळाने एप्रिल आणि मे महिन्यात दहावी आणि बारावीची लेखी परीक्षा आयोजित केली आहे.
बोर्डाच्या पत्रकानुसार, शाळा, कनिष्ठ महाविद्यालये आणि विद्यार्थ्यांना अभ्यासाचं नियोजन करता यावे, तसेच विद्यार्थ्यांचा ताण कमी व्हावा यासाठी मंडळाने एप्रिल-मे 2021 च्या लेखी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. www.mahahsscboard.in या अधिकृत वेबसाईटवर आजपासून हे वेळापत्रक उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
दरम्यान, दहावी आणि बारावीच्या संभाव्य वेळापत्रक बाबत काही हरकती सूचना असल्यास त्यावर राज्य अथवा विभागीय मंडळाकडे 22 फेब्रुवारीपर्यंत लेखी स्वरूपात पाठवाव्यात असे मंडळाकडून सांगण्यात आले आहे.
तसेच मंडळाच्या वेबसाईटवरील संभाव्य वेळापत्रकाची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा/उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडे छापील स्वरुपात दिले जाणारे वेळापत्रक अंतिम असेल. इतर वेबसाईटवरील किंवा इतर यंत्रणेने छापलेले तसेच व्हॉट्सॲप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रका ग्राह्य धरु नये, असेही बोर्डाने स्पष्ट केले आहे.