शिक्षण उपसंचालकांची माहिती
प्रतिनिधी / पणजी
गोवा शालान्त मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक दहा दिवस आधी जाहीर केले जाणार आहे. तोपर्यंत शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी इलेक्ट्रॉनिक माध्यमातून संपर्क ठेवावा, असा आदेश शिक्षण खात्याचे उपसंचालक शैलेश झिंगडे यांनी जारी केला आहे.
सोमवार 13 रोजी शिक्षण खात्याने जारी केलेल्या परिपत्रकाप्रमाणे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षकांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मार्गदर्शन करावे व सतत त्यांच्या संपर्कात रहावे. पालकांनी त्यांना सहकार्य करावे, असे या परिपत्रकात म्हटले आहे. परीक्षेचे नवे वेळापत्रक जाहीर करताना मुलांना किमान दहा दिवसांचा अवधी अभ्यासासाठी मिळणार आहे, असे त्यात म्हटले आहे.
विद्यार्थ्यांनी कोणताही ताण घेऊ नये. शिक्षकांचे मार्गदर्शन हवे असल्यास त्यांनी घरबसल्या फोन अथवा इतर माध्यमाचा वापर करून घ्यावा, असे आवाहन उपसंचालकांनी केले आहे.