ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
अमंली पदार्थ्यांची तस्करी करणाऱया 7 आरोपींना इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या पोटातून तब्बल 177 हेरॉईनच्या कॅप्सूल काढण्यात आल्या आहेत. त्यासाठी त्यांना 10 डझन केळी खाऊ घातली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले आरोपी अफगाणिस्तानहून दिल्लीत अंमली पदार्थांची तस्करी करत होते. अंमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या अधिकाऱयांनी एका गुप्त माहितीच्या आधारे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर संशयितांची झडती घेतली. मात्र, त्यांच्याकडे काहीच सापडले नाही. संशय बळावल्याने त्यांचे स्कॅनिंग आणि एक्सरे काढण्यात आला. त्यावेळी सात जणांच्या पोटात कॅप्सूल आढळल्या. या कॅप्सूल काढण्यासाठी त्यांना दहा डझन केळी खाण्यास दिली. त्यानंतर या कॅप्सूल जप्त करण्यात आल्या. तपासानंतर अन्य दोघांना अटक करण्यात आली आहे.