ऑनलाईन टीम / उन्नाव :
उत्तरप्रदेशातील उन्नावचे भाजपचे खासदार साक्षी महाराज यांच्यासह त्यांच्या साथीदारांना येत्या 10 दिवसात ठार करू, अशी धमकी पाकिस्तानातून देण्यात आली आहे. फोनवरून ही धमकी देण्यात आल्याचे साक्षी महाराजांनी म्हटले आहे.
साक्षी महाराजांना सोमवारी सायंकाळी 4.24 मिनिटे आणि पुन्हा 4.26 मिनिटांनी +923151225989 या पाकिस्तानी नंबरवरून फोन आला होता. ‘आमचा मित्र मोहम्मद गफ्फार याला पकडून तुम्ही स्वतःच्या मृत्यूला निमंत्रण दिलं आहे. मी आणि माझे मुजाहिद्दीन 24 तास तुमच्यावर लक्ष ठेवून आहे. तुमच्या सर्व कार्यक्रमांची माहिती आमच्याकडे आहे. येत्या 10 दिवसात तुम्हाला तुमच्या साथीदारांसह ठार करू,’ असे धमकी देणाऱ्याने म्हटल्याचे साक्षी महाराजांनी सांगितले.
याप्रकरणी साक्षी महाराजांनी पोलिसात तक्रार दिली आहे. त्यामध्ये त्यांनी माझ्यासह माझे साथीदार म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही धमकी देण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.