एसीबीची कारवाई- महसूल खात्याची खाबुगिरी पुन्हा समोर
प्रतिनिधी/ सातारा
न्यायालयात दाखल दाव्याच्या अनुषंगाने आवश्यक असलेला जमिनीबाबतचा अहवाल देण्यास मदत करण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना तासगाव, ता. सातारा येथील मंडल अधिकारी (वर्ग 3) संतोष शिवाजी झनकर (वय 37) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.
याबाबत मिळालेली माहिती अशी, या घटनेतील तक्रारदाराला जिल्हा पुनर्वसनाची जमीन मिळाली असून त्याबाबत न्यायालयात दावा दाखल आहे. त्या दाव्याच्या अनुषंगाने मौजे जिहे, ता. सातारा येथील गट नं 12 बाबत झालेले आदेश पोकळ असून अस्तित्वात नाही, असा अहवाल देण्यासाठी मदत करतो, असे सांगून तासगाव, ता. सातारा येथील मंडल अधिकारी संतोष शिवाजी झनकर याने तक्रारदाराकडे वीस हजार रुपयांची लाच मागितली होती.
तडजोडी अंती तक्रारदाराने दहा हजार रुपये देण्याचे मान्य केले. दरम्यान, तक्रारदाराने 15 मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार दाखल केली होती. प्राप्त झालेल्या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावला. त्यामध्ये दहा हजार रुपये घेताना मंडलाधिकारी संतोष शिवाजी झनकर त्यामध्ये अलगद सापळय़ात अडकला.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरिफा मुल्ला, पोलीस हवालदार शिंदे, साळुंखे, पोलीस नाईक अडागळे, पोलीस कॉन्स्टेबल काटकर, येवले, भोसले यांनी ही कारवाई केली.
महसूल खात्याची खाबुगिरी चव्हाटय़ावर
महसूल खात्यातील तलाठी, मंडलाधिकारीच नव्हे तर गतवर्षी खुद्द प्रांताधिकाऱयांच्या गाडीचा चालक देखील लाचखोरीत अडकला होता. त्यानंतर अनेक तलाठय़ांवर कारवाई झाली. मात्र, सुधारणा होईल ते महसूल खाते कसले ? कधी वाळूत, कधी जमिनीच्या कागदपत्रांसाठी तर नोंदणीसाठी तर हमखास ही मंडळी लाचखोरी करतात आणि सापडत आहेत. त्यांची खाबुगिरी अनेकदा चव्हाटय़ावर येवून सुध्दा त्यांना थोडी देखील ना जनाची, ना मनाची लाज वाटत नाही.