पाणीपुरवठामध्ये आणखी एक भानगड; ग्राहकाची आयुक्तांकडे तक्रार
सांगली : प्रतिनिधी
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील भानगडी संपायला तयार नाहीत. विभागातील एका कर्मचाऱ्याने यशवंतनगर येथील गुराप्पा पुजारी यांच्याकडून कनेक्शन देतो म्हणून १० हजार उकळले, पावती मात्र २०० रुपयांची दिल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे पुजारी यांना कनेक्शन देण्यात आले. मात्र आजअखेर त्यांना पाणी बिल मिळाले नसल्याची तक्रार पुजारी यांनी आयुक्त नितीन कापडणीस यांच्याकडे केली आहे. पुजारी यांना चुना लावणारा तो कर्मचारी कोण याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे.
अनधिकृत कनेक्शन, पाणी बिलमध्ये अपहाराच्या अनेक भानगडी रोज समोर येत आहेत. मानधन कर्मचारी बाबू करमरकर, पाईप निरीक्षक मनराज साळुंखे यांना याबाबत निलंबित करण्यात आले आहे. अनधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यातून रोज नव्या भानगडी पुढे येत आहेत. यशवंतनगर येथील गुराप्पा पुजारी यांनाही पाणीपुरवठा मधील एका कर्मचाऱ्याने चुना लावल्याचा नवा प्रकार समोर आला आहे. पुजारी यशवंतनगर मधील गजराज पार्क येथे राहतात.
१० मे २०२० रोजी एक अनोळखी व्यक्ती व पाणी पुरवठा विभागातील एक कर्मचारी त्यांच्याकडे आले. पाणी कनेक्शन देतो म्हणून १० हजार रुपये रोख घेतले. त्यापोटी १८ मे रोजी २०० रुपयांची पावती त्यांना दिली. त्यानंतर तब्बल तीन महिन्यांनी पुजारी यांना पाणी कनेक्शन देण्यात आले. पण आजअखेर पाणी बिल अथवा मीटर रिडींग साठी कोणीही आले नसल्याचे पुजारी यांनी त्यांच्या तक्रारी मध्ये नमूद केले आहे. फसवणूक करणाऱ्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी पुजारी यांनी आयुक्त कापडणीस यांच्याकडे केली आहे.