प्रतिनिधी/ दहिवडी
दहिवडी पोलीस ठाण्याची चारचाकी येवून गावात थांबते. त्यातून पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी उतरतात. सोबत तोंडाला मास्क लावलेला एक गोरी, रुबाबदार व तरुण व्यक्ती उतरते. ही व्यक्ती कोण याबद्दल कुजबूज सुरु होते. तितक्यात कुणीतरी माहिती देते… अरे ते जज आहेत, मोहनेसाहेब. कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे, तहसीलदार बाई माने, गटविकास अधिकारी गोरख शेलार, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली प्रशासन कामाला लागले आहे. मात्र या सर्वांच्यात दिवाणी व फौजदारी न्यायालय दहिवडीचे मुख्य न्यायाधीश अमितसिंह मोहने यांचे वेगळेपण उठून दिसत आहे.
न्यायालयाचा व सामान्य जनतेचा थेट संबंध अपवादानेच येतो. त्यातही न्यायाधीशांसमोर जायचे असेल तर अनेकांना कापरे भरते. त्यामुळे एक न्यायाधीश गावोगावी येवून जनजागृती करतायेत ही बाबच अनेकांच्या पचनी पडत नाही. न्यायाधीश अमितसिंह मोहने हे अतिशय कडक व कर्तव्यनिष्ठ म्हणून ओळखले जातात. त्यांनी भल्याभल्यांना वठणीवर आणले आहे. अगदी नेते मंडळी सुध्दा त्यांच्या पुढे जाताना देव पाण्यात ठेवून जातात.
पण याच न्यायाधीश श्री मोहने यांनी कोरोनाच्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. कोणताही बडेजाव न बाळगता ते पोलीस कर्मचार्यांसह गावोगावी जावून परिस्थितीची माहीती घेत आहेत. पोलीस गाडीतून उतरुन ते अतिशय शांतपणे आजूबाजूच्या परिसराची माहिती घेतात. ही व्यक्ती कोण म्हणून ग्रामस्थांच्यात चर्चा सुरु होते. कारण सहसा त्यांना कोणी ओळखत नाही. पण ज्यावेळी ते न्यायाधीश आहेत म्हणून समजते तसे सर्वचजण अतिशय शांतपणे उभे राहतात. न्यायाधीश श्री मोहने प्रत्येक ठिकाणी बैठकीत, चर्चेत सहभागी होवून ग्रामस्थांना, तरुणांना मार्गदर्शन करत आहेत. ग्रामस्थांनी नियमांचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करत आहेत.
स्वतः न्यायाधीशच सोबत फिरत असल्यामुळे पोलीसांचं काम सोप्पं होवून जाते. न्यायाधीशांची आदरयुक्त भिती ग्रामस्थांच्यात असल्यामुळे तावातावाने अडचणी न मांडता त्या शांतपणे सांगण्यावर ग्रामस्थ भर देतात. या समस्यावर आपल्या मृदू पण स्पष्ट व ठाम शब्दात न्यायाधीश श्री मोहने उपाय सांगतात. मी मोठा की तू मोठा, कोण चूक? कोण बरोबर? हे न पाहता सर्वांनी एकत्रितपणे कोरोनाचा सामना करण्याचे आवाहन ते करतात.
या सोबतच गरीब, गरजूंना मदत करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. तसेच मुक्या जनावरांनाही चारा, पाणी कसे मिळेल याकडे त्यांचे लक्ष असते. माकडांना स्वतःच्या हाताने त्यांनी केळी खाऊ घातली आहेत. न्यायाधीश अमितसिंह मोहने यांनी कोरोनाच्या काळात जनजागृती व मार्गदर्शन करुन माणदेशी जनतेच्या मनात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.