प्रतिनिधी/ म्हसवड
दहिवडी शहरातील जनतेत कोरोनाविषयीची जनजागृती व्हावी, यासाठी नगराध्यक्ष सतीश जाधव यांच्या संकल्पनेतून दहिवडी शहरातील प्रमुख रस्त्यावर पेंटींग करून प्रबोधनात्मक स्लोगन व चित्रे रेखाटले जात आहेत. रस्त्यावरील स्लोगन आता लक्षवेधी ठरत आहेत. रस्त्यावर रेखाटलेले चित्रे पाहून आपसुकच नागरिकांचे पाय घराकडे वळू लागले आहेत. नगराध्यक्ष जाधव यांनी राबवलेल्या या अनोख्या संकल्पनेचे जनतेतून कौतुक होत आहे. करोनाविषयी प्रबेधनासाठी अशा प्रकारे जिह्यात पहिल्यांदा संकल्पना लावणारे दहिवडी हे पहिले शहर ठरले आहे.
कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी जाधव यांच्या माध्यमातून सोडियम हायड्रोक्लोराईड या रसायनाची फवारणी दहिवडीसह वाडय़ावस्त्यांमध्ये केली जात आहे. शहरात कोरोनाचा अधिक उद्रेक होऊ नये, यासाठी ते स्वतः रस्त्यावर येऊन बारकाईने लक्ष ठेवून आहेत. ते जनतेशी सोशल मीडियाच्या माध्यमातून नियमित संवाद साधत आहेत. जनतेच्या अडीअडचणी ऐकून घेऊन त्या तत्काळ मार्गी लावण्यासाठी संबंधित अधिकाऱयांशी संवाद करून प्रश्न मार्गी लावत आहेत. यांच्या पुढाकारातून शहरासह सर्व वाडय़ावस्त्यामध्ये व गावामध्ये जंतुनाशक फवारणी करण्यात आली आहे. कोरोना महामारीचे गांभीर्य जनतेने लक्षात घ्यावे यासाठी नगराध्यक्ष सतीश जाधव यांची यंत्रणा विविध उपायोजना राबवत आहेत.