प्रतिनिधी/ दहिवडी
येथील नगरपंचायतीत लाईटच्या वायरमध्ये सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्कीट होऊन आग लागली. या आगीमध्ये महत्त्वाची कागदपत्रे, फर्निचर संगणक जळून खाक होऊन अंदाजे बारा ते पंधरा लाख रुपयाचे नुकसान झाले असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. सुट्टीचा दिवस असल्याने या दुर्घटनेत कोणतीही जिवितहानी झाली नाही.
याबाबत अधिक माहिती अशी, रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे नगरपंचायतीचे कार्यालय बंदच होते. मात्र नगरपंचायतीसमोर आरोग्य कर्मचारी आपल्या कामाचे नियोजन करीत होते. अचानक त्यांना कार्यालयातून बाहेर पडणारा प्रचंड धुराचा लोट दिसला. त्यावेळी त्यांनी याबाबतची कल्पना नगराध्यक्ष धनाजी जाधव, सर्व नगरसेवकांना दिली. मुख्य रस्त्यावरच कार्यालय असल्यामुळे बघ्याची गर्दी झाली. घटनेची माहिती समजताच नगराध्यक्ष, नगरसेवक, पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. कुलूप उघडेपर्यंत बांधकाम विभागाच्या जवळपास चाळीस फाईल्स अर्धवट जळाल्या होत्या. तसेच याच विभागाचे टेबल खुर्च्या, संगणक जळाल्याचे निदर्शनास आले. नागरिकांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली.