बेळगावच्या दोघांसह सहा अटकेत : साडेचार लाखासह दोन कारही ताब्यात
प्रतिनिधी / कारवार
बनावट नोटा चलनात आणण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या सहा जणांना दांडेली येथून ताब्यात घेऊन त्यांच्याकडून साडेचार लाख रुपयांच्या खऱया नोटा व 72 लाख रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. ही कारवाई दांडेली ग्रामीण पोलिसांनी केली. ताब्यात घेतलेल्यांमध्ये महाराष्ट्र, बेळगाव व दांडेली येथील संशयित आरोपींचा समावेश आहे.
किरण देसाई (वय 40), गिरीश पुजारी (वय 42 दोघेही रा. रत्नागिरी-महाराष्ट्र), अमर नाईक (वय 30, रा. किणये-ता. बेळगाव), सागर कुण्णूरकर (वय 28 रा. चव्हाट गल्ली, बेळगाव), शब्बीर कुट्टी (वय 45) व शिवाजी कांबळे (वय 52 दोघेही राहणार दांडेली) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यावर भा.दं.नि. 489(3) व 489(सी) कलमांतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती एसपी शिवप्रसाद देवराज यांनी दिली. वनश्रीनगरातील प्रमुख आरोपी शिवाजी कांबळे याच्या घरात साडेचार लाख रुपयांच्या खऱया नोटांच्या बदल्यात नऊ लाख रुपये किमतीच्या बनावट नोटा देण्याचा व्यवहार सुरू असताना ही कारवाई केली. यावेळी नोटा छपाईच्या यंत्रासह दोन कार जप्त केल्या आहेत.