केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या अधिकाऱयांकडून जागेची पाहणी
प्रतिनिधी/ खेड
कुविख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचे मूळगाव असलेल्या मुंबके येथील 6 वडिलोपार्जित मालमत्तांच्या लिलावानंतर लोटे येथे पेट्रोलपंपासाठी खरेदी केलेल्या भूखंडाचा 1 डिसेंबरला लिलाव होणार आहे. त्यानुसार स्मगलिंग ऍण्ड फॉरेन एक्सेंज मॅनिप्युलेशन व केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या अधिकाऱयांनी मंगळवारी जागेची पाहणी केली. या लिलाव प्रक्रियेकडे आता साऱयांच्या नजरा रोखल्या आहेत.
मुंबकेतील दाऊदच्या 6 मालमत्तांची लिलाव प्रक्रिया 10 नोव्हेंबर रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पार पडली. दाऊदचा दुमजली बंगला दिल्लीतील ऍड. अजय श्रीवास्तव यांनी 11 लाख 30 हजाराची बोली लावून व 153 सर्व्हे क्रमांकाची मालमत्ता 4 लाख 3 हजार रूपयांना खरेदी केली होती. अन्य चार मालमत्ता सर्वोच्च न्यायालयातील वकील भूपेंद्र भारद्वाज यांनी 7 लाख 18 हजार रूपयांना खरेदी केल्या होत्या.
मुंबकेतील 6 मालमत्तांच्या लिलाव प्रक्रियेनंतर लोटे येथे 30 गुंठे क्षेत्रात असलेल्या भूखंडाची लिलाव प्रक्रिया 1 डिसेंबरला होणार आहे. दाऊदने हा भूखंड पेट्रोल पंपासाठी खरेदी केला होता, असे म्हटले जाते. या भूखंडाचाही व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारेच लिलाव होणार आहे. या पार्श्वभूमीवर स्मगलिंग ऍण्ड फॉरेन एक्सेंज मॅनिप्युलेशन व केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या अधिकाऱयांनी नुकतीच बोलीधारकांसह भूखंडाची पाहणी केल्याची माहिती पुढे आली आहे.