गुजरात एटीएसची कारवाई : 24 वर्षांपासून होता फरार
अहमदाबाद / वृत्तसंस्था
कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा निकटचा साथीदार अब्दुल माजिद कुट्टीला झारखंडमधून अटक केली आहे. तो मूळचा केरळमधील असून गेल्या 24 वर्षांपासून फरार होता. गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. 1996 पासून अब्दुलचा शोध घेण्यात येत होता, असे एटीएसच्या अधिकाऱयांनी सांगितले.
1996 मध्ये 106 पिस्तूल, 750 काडतुसे आणि चार किलोग्रॅम आरडीएक्स गुजरातमध्ये पाठवण्यात आले होते. या प्रकरणी गुजरात एटीएस अब्दुलच्या शोधात होते. या प्रकरणातील इतर आरोपींना अटक करण्यात आली होती. मात्र, 24 वर्षांपासून अब्दुल फरार होता. त्यामुळे आता अब्दुलला अटक करण्यात आल्याने गुजरात एटीएसला मोठे यश मिळाले आहे. 1996 च्या एका शस्त्रास्त्र प्रकरणात एटीएसने त्याला ताब्यात घेतले आहे.
अब्दुल माजिद ओळख लपवून गेल्या काही वर्षांपासून झारखंडमध्ये राहत होता. तपासादरम्यान गुजरात एटीएसला याबाबतची माहिती मिळाली. मात्र, त्याच्या ठावठिकाण्याबाबतची ठोस माहिती नसल्याने तो एटीएसला गुंगारा देत होता. अखेर गुजरात एटीएसने त्याला झारखंडमधून अटक केली आहे.