अभिनेत्री प्रियमणिने व्यक्त केली खंत
अभिनेत्री प्रियमणि ‘द फॅमिली मॅन’ या वेबसीरिजमध्ये मनोज वाजपेयीसोबत दिसून आली होती. बॉलिवूड चित्रपटांमध्ये केरळ आणि चेन्नईच्या कलाकारांच्या हिदी भाषेला वेगळय़ा एक्सेंटद्वारे दाखविले जाते. दक्षिण भारतीय व्यक्तिरेखांना हिंदी चित्रपटात वेगळय़ा प्रकारे दर्शविण्यात आल्याचे तिने एका मुलाखतीत म्हटले आहे.
बॉलिवूड प्रेक्षकांदरम्यान सध्या दाक्षिणात्य चित्रपट खूपच लोकप्रिय होतोय. तेथील गुणवत्ता लोकांकडून पसंत केली जातेय. श्रीदेवी, रेखा, हेमा मालिनी आणि वैजयंतीमाला यांचे बॉलिवूडमध्ये मोठे वर्चस्व होते. परंतु त्यांच्यानंतर दक्षिणेतील कुठलाही कलाकार त्यांच्यासारखा दिसून आला नाही. आम्ही बॉलिवूडमध्ये केवळ हिंदी बोलणाऱया लोकांना पाहिले. दक्षिणेतील कलाकारांना योग्यप्रकारे हिंदी बोलता येत नसल्याचे दर्शविण्यात आले. आमच्या भाषेची थट्टा करण्यात आल्याचे तिने म्हटले आहे.
परंतु आता गोष्टी बदलत आहेत. दक्षिणेतील अनेक कलाकार आता बॉलिवूडमध्ये काम करत असून ते यशस्वी ठरत आहेत. दक्षिणेतील गुणवत्तेला कौतुकाची थाप मिळत असल्याने आनंद वाटतोय असे प्रियमणि म्हणाली. प्रियमणिने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत भरपूर काम केले आहे. तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळी चित्रपटांमध्ये ती दिसून आली आहे.