सुसेरीतील कृत्याचा 24 तासातच छडा
प्रतिनिधी/ खेड
तालुक्यातील सुसेरी नं. 2 येथील बेपत्ता बाळकृष्ण भागोजी करबटे या 65 वर्षीय वृद्धाचा मृतदेह 13 तासांच्या शोधकार्यानंतर सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास नारिंगी नदीपात्रात आढळला. येथील पोलिसांनी अवघ्या 24 तासांतच वृद्धाच्या खूनाचा छडा लावत मंगळवारी सकाळच्या सुमारास चौघांच्या मुसक्या आवळल्या. वृद्धाच्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांसाठी खून केल्याची कबुली चौघांनी दिली. या चौघांचीही न्यायालयाने 10 दिवस पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.
स्वयंम शशिकांत शिंदे (21), अजय विजय शिंदे (23), राजेश पांडुरंग टाणकर (46), नीलेश पांडुरंग टाणकर (34, चौघेही सुसेरी नं. 2) अशी अटकेतील चौघांची नावे आहेत. मूळचे सुसेरी व सध्या मुंबई येथे वास्तव्यास असलेले बाळकृष्ण करबटे कार्यासाठी गावी आले होते. रविवारी रात्री ते नेहमीप्रमाणे कचरा टाकण्यासाठी बॅटरी घेऊन नदीकिनारी गेले होते. रात्री उशिरापर्यंत ते घरी न परतल्याने नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली. मात्र त्यांचा थांगपत्ता लागला नाही. सोमवारी नारिंगी नदीकिनारी बॅटरी, हाताची तुटलेली बोटे, रक्त व सुरा आढळला. पोलीस निरीक्षक निशा जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे घटनास्थळी पोहोचले. मात्र सोमवारी सायंकाळी उशिरापर्यंत ते हाती लागले नव्हते. रत्नागिरी येथून ठसेतज्ञ व श्वानपथक पाचारण करण्यात आले.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, पोलीस उपविभागीय अधिकारी शशिकिरण काशिद, गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा रातोरात येथे दाखल झाले. बेपत्ता वृद्धाचा घातपात झाल्याच्या शक्यतेने पोलिसांनी जंगल पिंजून काढले. स्थानिक ग्रामस्थ, पोलीस यंत्रणा, रेस्क्यू टीम, मदत ग्रुपच्या सहाय्याने 13 तासानी रात्री 12.30च्या सुमारास त्यांचा मृतदेह नारिंगी नदीपात्रात सापडला. मृतदेह हाती लागल्यानंतर श्वानपथकाने काढलेला माग, घटनास्थळी आढळलेल्या वस्तू व काही पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी 4 संशयितांना खेड व चिपळूण परिसरातून ताब्यात घेतले. या चौघांना पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर वृद्धाच्या खूनाची कबुली दिली. वृद्धाच्या अंगावरील सोन्याचे दागिने हडप करण्यासाठी खून केल्याचे तपासाअंती उघड झाले आहे. येथील पोलिसांनी अवघ्या 24 तासांत खूनाचा छडा लावल्याने पोलिसांचे कौतुक होत आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे करत आहेत.