मदतीच्या हाकेला मिळाली दातृत्वाची साथ : कासार्डेत घराचे काम, सोबत वीजपुरवठाही झाला तात्काळ सुरू
प्रतिनिधी / कणकवली:
कासार्डे – तर्फेवाडी येथील वैजयंती मिराशी या वृद्धेच्या पडक्या घराची परिस्थिती ‘तरुण भारत’मधून प्रसिद्ध होताच तिला मदतीचा ओघ सुरू झाला आहे. जि. प. सदस्य संजय देसाई यांनी तिच्या घरी भेट देत घर तातडीने बांधून देण्यात येईल, असे सांगत ती राहत असलेल्या घराशेजारीच नवीन घरासाठीच्या कामाचा शुभारंभही करण्यात आला. आमदार नीतेश राणे यांनीही दखल घेत सर्वतोपरी मदत करण्याचे सूचित केले आहे. सभापती मनोज रावराणे यांनीही शुक्रवारी कासार्डेला भेट देत प्रशासकीय पातळीवर तसेच आपल्या माध्यमातून लागणारी सर्व मदत केली जाईल, असे तरुण भारतशी बोलताना सांगितले.
जि. प. सदस्य संजय देसाई यांनी कासार्डे येथील वैजयंती मिराशीच्या घरी भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत ग्रा. पं. सदस्य गणेश पाताडे, बाबी गाडे, विठ्ठल गाडे, भाऊ कोलते उपस्थित होते. त्यानंतर जि. प. सदस्य संजय देसाई, ग्रा. पं. कर्मचारी विद्याधर नकाशे यांनीही तिच्यासाठीच्या घराच्या कामाचा शुभारंभ बुधवारपासूनच करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. दुपारनंतर जेसीबीच्या माध्यमातून कामही सुरू करण्यात आल्याचे संजय देसाई यांनी सांगितले.
यावेळी सरपंच बाबू तानवडे, संजय नकाशे, ग्रा. पं. कर्मचारी विद्याधर नकाशे, गणेश पाताडे उपस्थित होते. आपण सर्व मिळून आजपासूनच घराचे कामही सुरू करत असल्याचे देसाई यांनी सांगितले. तर स्वराज्य ट्रकचालक, मालक संघटनेमार्फत अवाश्यक मदत करण्यात येणार असल्याचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय नकाशे यांनी सांगितले आहे. तसेच ती राहत असलेल्या घरातील खंडित करण्यात आलेला वीजपुरवठाही बुधवारी सुरू करण्यात आला.
दरम्यान, तरुण भारतचे वृत्त प्रसिद्ध होताच आमदार नीतेश राणे तसेच भाजपाच्या काही पदाधिकारी, लोकप्रतिनिधींनीही दखल घेत वैजयंती मिराशी हिला सर्वतोपरी मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. आमदार नीतेश राणे तसेच भाजपाच्या माध्यमातून तिच्यासाठी घर उभारणीकरीता लागणारे सर्व सहकार्य करण्यात येणार असल्याचे नगरसेवक शिशीर परुळेकर म्हणाले.
दरम्यान, सभापती मनोज रावराणे यांनीही या वृत्ताची दखल घेत सर्व प्रशासकीय अधिकाऱयांसोबत गुरुवारी कासार्डे येथे भेट देऊन वैजयंती मिराशी हिचे घर उभारण्यासाठी प्रशासकीय पातळीवर मदत करण्यात येणार आहेत. त्यात अडचणी असल्यास तिला घर उभारण्यासाठीची कार्यवाही मे महिन्याच्या आत पूर्ण करण्यात येणार असल्याचे तरुण भारतशी बोलताना सांगितले. तर ‘आम्ही कणकवली’च्या माध्यमातूनही तिला आर्थिक मदत करण्यासाठी पैसेही गोळा करण्यात येत आहेत. दरम्यान, कासार्डे येथील साईबाबा सोशल क्लबच्या माध्यमातून धान्य, कपडे, भांडी व रोख रक्कम अशाप्रकारची मदत करण्यात आली. अध्यक्ष मिंगेल मन्तेरो, सल्लागार जयेश धुमाळे, नितीन लाड, प्रदीप नारकर तसेच कासार्डे गावचे सरपंच बाबू तानवडे, जिल्हा परिषद सदस्य संजय देसाई, विद्याधर नकाशे, संजय नकाशे, गणेश पाताडे आदी मान्यवर उपस्थित होते.
मदतीचे आवाहन
श्रीमती मिराशी हिच्या घराचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. ज्यांना तिला मदत करावयाची आहे, त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तिच्या 008400000007689, आयएफएससी कोड : एसआयडीसी0001008 या खात्यावर रक्कम जमा करावी व ज्यांना रोख अथवा वस्तू स्वरुपात मदत करावयाची आहे, त्यांनी विद्याधर नकाशे व गणेश पाताडे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन भाजप तालुकाध्यक्ष संतोष कानडे यांनी केले आहे.
निवाऱयासोबत जगण्यासाठी आधार
दरम्यान, वैजयंती मिराशी हिच्या घराचे वृत्त प्रसिद्ध होताच घर बांधणीसाठी मोठय़ा प्रमाणात दानशूर पुढे येताना दिसत आहेत. अनेकांनी घर उभारणी करून देण्यासाठी मदतीचे आश्वासन देतानाच काहींनी कामही सुरू करण्यात येत असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे अशी मदत करणाऱया सर्वांनी एकत्रितरित्या ठरवत तिला आवश्यक सोईंसह घर बांधून देतानाच उर्वरित रोख रक्कम तिच्या खात्यावर जमा करावी. ज्या रकमेच्या माध्यमातून तिला प्रतिमहा एक ठराविक रक्कम व्याजाच्या माध्यमातून मिळू शकेल. जेणेकरून संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून मिळणाऱया मदतीसोबत तिला पुढील आयुष्य जगण्यासाठी महिन्याला ठराविक रक्कम मिळू शकेल यासाठीही प्रयत्न होण्याची गरज आहे.