‘कोजिमाशि’च्या निवडणुकीत शिक्षक नेते दादा लाड यांची प्रत्येक चाल यशस्वी : विरोधकांचे विक पॉईंट शोधून : मताधिक्य वाढविण्यात सत्ताधारी यशस्वी : सभासदांची मने जिंकण्यामध्ये विरोधक ‘फेल’ : लाड यांचा सभासदांसोबतचा थेट संपर्क ठरला फायद्याचा
कृष्णात चौगले/कोल्हापूर
गेल्या आठरा वर्षात राबविलेल्या सभासद हिताच्या योजना, गतनिवडणुकीत जाहीर केलेल्या वचननाम्याची परिपुर्तता, अर्थिक अडचणीत सापडलेल्या सभासदांसाठी लवचिक धोरण, संस्थेच्या 70 टक्क्यांहून अधिक सभासदांशी थेट संपर्क, प्रचारात घेतलेली आघाडी आदी अनेक कारणांमुळे कोजिमाशि पतसंस्थेच्या निवडणुकीत सत्ताधारी आघाडीने 21 जागांवर निर्विवाद यश मिळवले. यामध्ये सभासदांना भावणारे कोणते मुद्दे प्रचारामध्ये अधिक प्रभावीपणे मांडायचे ? विरोधकांच्या आरोपांना कशा पद्धतीने उत्तर द्यायचे ? हे निश्चित करून त्यांच्या प्रचारामधील हवा काढून घेण्यामध्ये शिक्षक नेते दादा लाड यांची चाणक्यनिती यशस्वी ठरली. त्यामुळेच हतबल झालेल्या विरोधकांना पराभवाला सामोरे जावे लागले.
‘कोजिमाशि’ पतसंस्थेच्या निवडणुकीमध्ये शिक्षक नेते दादा लाड यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी स्वाभिमानी सहकार आघाडीने विरोधी आघाडीचे पानिपत केले. विरोधी आघाडीचे नेतृत्व करताना शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी प्रचारामध्ये दादा लाड यांनी शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये कशी गद्दारी केली ? हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. सत्ताधाऱयांचा भ्रष्ट कारभार असून त्यांना पतसंस्थेतून पायउतार करावे असे आवाहनही त्यांनी केले. तर विरोधकांचे आरोप खोडून काढण्याबरोबरच गेल्या 18 वर्षातील कामाचा लेखाजोखा आणि पुढील पाच वर्षात कशा पद्धतीने 16 कलमी वचननाम्याची पुर्तता केली जाईल ? याचे सत्ताधाऱयांनी प्रचारातून विवेचन केले. आणि त्याच्यावर सभासदांनी विश्वास ठेवला.
‘शब्द दिला, धोरण राबविले, यशस्वी केले’
‘शब्द दिला, धोरण राबविले, यशस्वी केले’ या टॅगलाईनखाली मयत सभासद कर्जमाफी, 21 ते 25 टक्क्यांपर्यंत लाभांश वाटप, उत्कृष्ट व्यवस्थापनामुळे ठेवींची वाढलेली संख्या, दीपावली भेट, कोविड काळात संस्थेच्या 806 सभासदांना अर्थिक हातभार, अपघात विमा योजना, महिला सखी मंचच्या माध्यमातून महिलांसाठी राबविलेल्या योजना आदी बाबी सभासदांपुढे मांडून त्याचे मतामध्ये रूपांतर करण्यामध्ये दादा लाड यशस्वी ठरले. परिणामी सभासद हितांच्या योजनांच्या गर्दीत विरोधकांनी लाड यांच्यावर केलेले वैयक्तीक आरोप फिके पडले. तसेच विरोधी आघाडीची बांधणी होण्यापूर्वीच लाड यांनी प्रचारात घेतलेली आघाडी विजयी वाटचालीसाठी पोषक ठरली. गत निवडणुकीतील विरोधी पॅनेल प्रमुख राजेंद्र रानमाळे हे सत्ताधारी आघाडीत सहभागी झाल्यामुळेही लाड यांची काहीअंशी ताकद वाढली.
विरोधी आघाडीची रणनिती अयशस्वी
विरोधी पॅनेलची बांधणी करताना गेली पाच वर्षे सत्ताधाऱयांविरोधात आवाज उठवणारे समीर घोरपडेंसह अन्य काही जणांना डावलले गेले. त्याचा फटका विरोधी आघाडीला बसला. शिक्षक आमदार जयंत आसगावकर शेवटच्या काही दिवसांत विरोधी आघाडीकडून प्रचारात उतरले. त्यामुळे त्यांना पतसंस्थेच्या प्रत्येक सभासदांपर्यंत पोहोचता आले नाही. आसगावकर यांनी सुरुवातीपासूनच प्रचारात आघाडी घेतली असती तर निकालामध्ये चित्र वेगळे दिसले असते. विरोधी पॅनेलचे प्रचारप्रमुख माजी संचालक एच.आर.पाटील यांनी शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये आमदार आसगावकर यांना पराभूत करण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न केला, लाड यांच्या नेतृत्वाखाली पतसंस्थेत कशा पद्धतीने भ्रष्टाचार सुरु आहे, आदी मुद्दे सभासदांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला. पण हे मुद्दे सभासदांना भावले नसल्याचे निकालातून स्पष्ट झाले.