जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या स्मशानभूमीत दफनविधी
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
अफगाणिस्तानमधील कंधार प्रांतात तालिबानींनी हत्या केलेले भारतीय पत्रकार (फोटो जर्नलिस्ट) दानिश सिद्दिकी यांचे पार्थिव रविवारी सायंकाळी दिल्लीमध्ये दाखल झाले. कुटुंबीय आणि नातेवाईकांनी अंत्यदर्शन घेतल्यानंतर त्यांचे पार्थिवावर दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामियाच्या स्मशानभूमीत दफन करण्यात आले. जामिया मिलिया इस्लामियाच्या कुलगुरूंनी पार्थिव विद्यापीठाच्या स्मशानभूमीत दफन करण्याची सिद्दिकी यांच्या कुटुंबियांची विनंती मान्य केली होती. ही स्मशानभूमी विद्यापीठाचे कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय आणि अल्पवयीन मुलांसाठी खास बनवले गेले आहे. दानिश सिद्दिकी यांनी या विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतले असून त्यांचे वडील अख्तर सिद्दिकी हे विद्यापीठाचे डीन होते.
रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास दानिश सिद्दिकी यांचे पार्थिव दिल्ली विमानतळावर पोहोचले. तालिबान्यांनी त्यांचा मृतदेह आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस समितीकडे सोपविल्यानंतर मृतदेह भारतात आणण्यात आला. अंत्यसंस्कारापूर्वी जामिया टीचर्स असोसिएशनने दानिश सिद्दिकी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. सिद्दिकी यांच्या हत्येचा संपूर्ण भारतात निषेध होत असून संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सरचिटणीसांनी दुःख व्यक्त केले आहे. त्याचबरोबर युद्धग्रस्त देशातील यूएन मिशनने त्यांची व अन्य पत्रकारांच्या हत्येची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
अफगाणमध्ये सुरू असलेल्या संघर्षाचे कव्हरेज करण्यासाठी गेले असता सिद्दिकी यांची गोळय़ा घालून निर्घृण हत्या करण्यात आली होती. सिद्दिकी यांची गणना जगातील सर्वोत्कृष्ट फोटोग्राफरमध्ये होत होती. ते सध्या आंतरराष्ट्रीय संस्था ‘रॉयटर्स’साठी काम करत होते. अफगाणिस्तानमध्ये उसळलेला हिंसाचार कव्हर करण्यासाठी ते येथे गेले होते. अफगाण स्पेशल फोर्ससोबत राहून फोटो जर्नलिस्ट सिद्दिकी आपली डय़ुटी बजावत होते. दहशतवाद्यांनी अफगाण स्पेशल फोर्सच्या तुकडीवर हल्ला केल्यामुळे त्यांना प्राणास मुकावे लागले. तालिबानच्या हिंसक कारवाया जगापुढे आणण्यासाठी फोटोग्राफी करत असतानाच त्यांची हत्या झाली आहे.