अफगाणिस्तानात गमवाला होता जीव : काश्मीरच्या सना इरशादलाही पुरस्कार
वृत्तसंस्था / न्यूयॉर्क
2022 या वर्षातील पुलित्झर पुरस्कारांची घोषणा झाली आहे. दिवंगत भारतीय पत्रकार दानिश सिद्दीकी यांच्यासह आणखीन तीन भारतीय पत्रकारांना सन्मानित करण्यात आले आहे. रॉयटर्ससाठी काम करणाऱया पत्रकार सना इरशाद मट्टू, अमित दवे आणि अदनान आबिदी यांना कोरोना महामारीदरम्यान काढलेल्या छायाचित्रांसाठी हा पुरस्कार मिळाला आहे. यातील दानिश सिद्दीकी यांना यापूर्वी देखील पुलित्झर पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. सिद्दीकी यांनी मागील वर्षी अफगाणिस्तानात जीव गमावला होता.
28 वर्षीय सना इरशाद श्रीनगरची रहिवासी असून तिने अल जझीरा, द नेशन, टाइम, टीआरटी वर्ल्ड, साउथ चायना मॉर्निंग पोस्ट आणि कारवां नियतकालिक यासारख्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांमध्ये काम केले आहे. सनाने 10 जून 2021 रोजी काश्मीरच्या अनंतनाग जिल्हय़ातील लिद्दरवाट येथील लसीकरण मोहिमेचे छायाचित्र काढले होते. या छायाचित्रात आरोग्य कर्मचारी एका मेंढपाळाला लस देताना दिसून येतो.
दानिश सिद्दीकी आणि त्यांच्या टीमला उत्कृष्ट कामगिरीसाठी 2018 मध्ये पहिला पुलित्झर पुरस्कार मिळाला होता. स्वतःच्या छायाचित्रांद्वारे सिद्दीकी यांनी म्यानमारच्या रोहिंग्या शरणार्थींची समस्या दाखविली होती.
वॉशिंग्टन पोस्टने सार्वजनिक सेवा पत्रकारिता शेणीचा पुलित्झर पुरस्कार पटकाविला आहे. युएस कॅपिटॉलमधील 6 जानेवारी 2021 मधील हिंसेच्या वृत्तांकनाकरता हा पुरस्कार वॉशिंग्टन पोस्टला मिळाला आहे. तर मियामी हेराल्डला सर्फसाइड कोंडो जमीनदोस्त होण्यासंबंधीच्या वृत्तांकनासाठी पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. न्यूयॉर्क टाईम्सने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वृत्तांकन दोन्ही श्रेणींमधील पुलित्झर स्वतःच्या नावावर केला आहे. टैम्पा बे टाइम्सने शोध पत्रकारिता शेणीचा पुरस्कार पटकाविला आहे.
पुलित्झर पुरस्कार हा पत्रकारितेच्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करण्यासाठी प्रदान केला जातो. तसेच याला पत्रकारितेच्या क्षेत्रातील नोबेल देखील म्हटले जाते. हंगेरीतील वृत्तपत्र प्रकाशक जोसेफ पुलित्झर यांच्या नावावरून हा पुरस्कार देण्यात येतो. पुरस्कार विजेत्याला 15 हजार डॉलर्स इतकी रक्कम प्रदान केली जात असते.