वार्ताहर / मौजे दापोली
गेले काही दिवस दापोलीच्या पाऱ्यात घसरण होवून दापोलीकरांना थंडीने चांगले गारठवले आहे. दापोलीचा तापमान पारा 10 अंश सेल्सिअस असल्याचे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाकडून कळवण्यात आले आहे.
दापोलीचा गेले काही दिवस, 12.4, 11.9, 11 तर त्यानंतर सोमवारी 10 अंश सेल्सिअस इतका किमान तापमान झाल्याने दापोलीकरांना हुरहूडी भरली. वाऱ्याचा वेग देखील वाढला असल्यामुळे तसेच हिमालयाकडून गार वारे वाहत असल्यामुळे मिनिमहाबळेश्वर म्हणून संबोधल्या जाणाऱ्या दापोली तालुक्यातील नागरीकांना थंडीचा आनंद घेता येत आहे. आंबा, काजू बागायतदार देखील सुखावले आहेत.
दापोलीचे कमाल तापमान 33.7 अंश सेल्सिअस असून किमान तापमान 10 अंश सेल्सिअस इतके आहे. तर सापेक्ष आर्द्रता सकाळी 88 टक्के तर दुपारी 52 टक्केची नोंद करण्यात आली आहे. गेल्यावर्षी या तारखेस कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 13 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली होती. असे देखील विद्यापीठाकडून कळवण्यात आले आहे.