10 हजाराची लाच स्वीकारल्याचा आरोप
प्रतिनिधी/ रत्नागिरी
दापोली तालुक्यातील आंजर्लेचे मंडल अधिकारी प्रितम कासारे व केळशीचे तलाठी प्रभाकर सोनवणे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दापोली तहसील कार्यालय व हॉटेलमध्ये लाच घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होत़ा यातील प्रभाकर सोनवणे यांना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले होत़े मात्र मंडल अधिकारी प्रितम कासारे घटनेच्या दिवसापासून फरार झाला आह़े
दरम्यान केळशी येथील तलाठी सानावणे यांच्यावर कारवाई करावी, असा अहवाल ऍन्टीकरप्शनकडून पाठवण्यात आला आह़े मात्र त्यांचे निलंबन करण्यात आल्याबाबत अद्याप कोणतीही माहिती लाचलुचपत विभागाला प्राप्त झालेली नाह़ी या बाबत अधिक वृत्त असे की, केळशी येथील जमीन तक्रारदाराने घरासह 12 जून 2018 रोजी खरेदीखताने खरेदी केली आहे. खरेदीखताच्या पेपरप्रमाणे त्या जमिनीची नोंद सातबारा उतारावर होऊन त्यांच्या नावे लागण्यासाठी जमिनीचे खरेदीखताचे पेपर तलाठी सोनवणे यांच्याकडे दिले होते. या कामाचा पाठपुरावा करण्यासाठी तक्रारदारांनी दापोली तहसील कार्यालयात जाऊन मंडल अधिकारी कासारे व तलाठी सोनवणे यांची भेट घेतली असता दोघांनी 15 हजार रूपये लाच रक्कमेची मागणी करून ती रक्कम दिल्याशिवाय तुमची कामे करणार नसल्याचे सांगितले होते. यामुळे या दोन्ही आरोपींविरोधात तक्रारदाराने 26 डिसेंबर 2019 रोजी लाचेची मागणी केल्याची लेखी तक्रार रत्नागिरी येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली होती.
या तक्रारीच्या अनुषंगाने 26 डिसेंबर 2019 रोजी करण्यात आलेल्या पडताळणी कारवाईमध्ये कासारे व सोनवणे या दोन्ही आरोपींनी तक्रारदाराकडे त्याने खरेदी केलेल्या जमिनीची सातबारा उतारावर नोंद करून सातबारा उतारा देण्यासाठी त्यांच्याकडे 15 हजार रूपये लाच रक्कमेची मागणी करून तडजोडीअंती 10 हजार रूपये स्वीकारल्याचे मान्य केले. पडताळणीमध्ये निष्पन्न झाल्यानुसार 31 डिसेंबर रोजी सापळा रचून दोन्ही आरोपींनी लाच रक्कम 10 हजार रूपये स्वत:साठी व मंडल अधिकारी कासारे यांच्यासाठी दापोली तहसील कार्यालयासमोरील हॉटेल गुरूप्रसाद येथे स्वीकारल्यानंतर तलाठी सोनवणे यांना तहसील कार्यालय आवारातील तलाठी संगणक भवनामध्ये दुपारी पंचासमक्ष रंगेहाथ पकडण्यात आले होत़े