वार्ताहर/ मौजे दापोली
एका महिलेने 1 लाख पौंड (93 लाख) रुपयांची रोकड कुरियरने पाठवली आहे, ते कुरियर विमानतळावरून सोडवून घ्या, असे प्रलोभन दाखवून जालगाव येथील एका व्यापाऱयाची तब्बल 30 लाख 73 हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार दापोली पोलीस स्थानकात दाखल झाली आहे.
याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जालगाव येथील विजय प्रभाकर खोत यांची जानेवारी 2020 मध्ये अमेलिया जॅक्सन नावाच्या लंडन येथील एका महिलेशी फेसबुकवरून ओळख झाली. फेब्रुवारीमध्ये या महिलेने खोत यांच्या व्हाट्सऍपवर एक पार्सल पाठवले आहे, असा मेसेज केला. पार्सलमध्ये असलेल्या वस्तूंचे फोटोही व्हाट्सऍपवर टाकले. त्यानंतर प्रिया शेठ या महिलेने तुमचे विमानतळावर कुरियर आले आहे, त्यात फोटोत दाखवलेल्या वस्तू व एक लाख पौंड (93 लाख रुपये) आहेत असे सांगून त्यांनी यासंदर्भात कस्टम व रिझर्व्ह बँक या शासकीय आस्थापनांची प्रमाणपत्रेही पाठवली होती, ही कागदपत्रे खरी असतील हे गृहीत धरून खोत यांनी त्यांच्याकडे मागणी केली जात होती तसे बँकेत पैसे भरले.
फसवणूक करणाऱया व्यक्तीने खोत यांना दोन एटीम कार्डेही पाठवली. या एटीएमद्वारे खोत यांनी दोनवेळा पैसेही काढले. या सर्व प्रकारात खोत यांनी तब्बल 30 लाख 73 हजार 100 रुपये या महिलेने पाठवलेल्या ई-मेलमध्ये दिलेल्या बँक खात्यात भरणा केले. त्यानंतर खोत यांना कुरियर काही आले नाही. त्यामुळे आपण फसलो गेल्याचे खोत यांच्यो लक्षात आल्यावर त्यांनी दापोली पोलीस स्थानक गाठून अमेलिया जॅक्सन, प्रिया शेठ, पूजा शर्मा यांच्याविरोधात प्रलोभन दाखवून फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार दापोली पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील करत आहेत.
प्रलोभनाला बळी न पडण्याचे आवाहन
फेसबुक, व्हाट्सऍप अशा सोशल मिडियातून फसवणुकीचे प्रकार घडत आहेत. या लोकांच्या प्रलोभनाला आकर्षित होऊन अनेक व्यक्तींनी आयुष्यभराची जमवलेली पुंजी पणाला लावली आहे. त्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांना मोठा धक्का बसत आहे. त्यामुळे कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये, असे आवाहन दापोलीचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी केले आहे.