प्रतिनिधी/ दापोली
दापोलीत दाखल असणाऱया 17 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 14 जणांना डिस्चार्ज दिल्याचे दिलासादायक वृत्त ताजे असतानाच तालुक्यात आणखीन तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात केळशी येथील एका नऊ महिन्यांच्या गरोदर महिलेचाही समावेश असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.
केळशीतील गरोदर महिलेला कोरोनाची बाधा झाल्याचे गुरुवारी रात्री आरोग्य विभागाला प्राप्त झालेल्या अहवालानुसार स्पष्ट झाले. खबरदारी म्हणून त्या महिलेला रत्नागिरी येथे हलवण्यात आले आहे. जिल्हा कोविड रुग्णालयात तिच्यावर उपचार करून तिची सुखरूप प्रसूती करण्याचे मोठे आव्हान आता वैद्यकीय अधिकाऱयांसमोर आहे.
या महिलेला मुंबई प्रवासाचा इतिहास आहे. ही महिला मुंबईतून 18 तारखेला आपल्या गावी आल्याची नोंद आहे. ही महिला गरोदर असल्याने नियमित तपासणीसाठी दापोली उपजिल्हा रुग्णालयात आली होती. मात्र तिला कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्याने 26 मे रोजी तिचे स्वॅब घेण्यात आले. 28 मे रोजी तिचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने रात्री तिला दापोलीत आणण्यात आले. तसेच पुढील उपचारासाठी तत्काळ रत्नागिरी येथे पाठवण्यात आले. त्याठिकाणी एका स्वतंत्र खोलीत तिची देखभाल केली जाणार आहे. तसेच तिच्यासोबत एका नातेवाईकाला राहण्याची परवानगी देण्यात येणार आहे.
तसेच दापोली तालुक्यातील खेर्डी, देवके या गावांमध्ये 16, 17 मे यादरम्यान मुंबईतून आलेल्या अन्य दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांना कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्यामुळे आरोग्य कर्मचाऱयांनी त्यांचे स्वॅब घेतले होते. तसेच ग्राम कृती दलानेसुद्धा त्यांची खबर आरोग्य विभागाला दिली होती. त्यामुळेच त्यांचे नमुने घेण्यास मोठी मदत झाली. देवके व खेर्डी येथील दोन्ही पुरुष रूग्ण क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र केळशी येथील महिलेला होम क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यांचा प्रवासाचा इतिहास तपासण्याचे काम सुरू आहे. हे तिघे कोणाकोणाच्या संपर्कात आले होते त्यांचेही नमुने घेतले जाणार आहेत. तसेच देवकी व केळशी गावांमध्ये कंटेन्मेंट झोनची तयारी सुरू करण्यात आली आहे. यापैकी देवके गावांमध्ये यापूर्वी कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले होते. त्यामुळे देवके यापूर्वी कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले होते. मात्र कंटेनमेंट झोन उठण्याआधीच पुन्हा एक कोरोनारुग्ण आढळल्याने येथील कंटेनमेंट झोन कायम ठेवण्यात येणार आहे. तसेच खेर्डी व केळशी या दोन गावांमध्ये नव्याने पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने या दोन्ही गावांमध्ये आता कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आला आहे.
दापोली तालुक्यात यापूर्वी माटवणमधील वयोवृद्ध आईला व तिच्या मुलाला कोरोनाची बाधा झाली होती. त्यात आईचा मृत्यू झाला होता. तर मुलाने कोरोनावर मात केली आहे.
चौकट- केळशी येथील कोरोना बाधित 9 महिन्याच्या गरोदर महिलेच्या पतीचा सलूनचा व्यवसाय असल्याने व तो अनेक जणांच्या संपर्कात आल्याने केळशी गावात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता प्रशासनाकडून त्यांचा 14 दिवसांचा इतिहास तपासला जाणार असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.