प्रतिनिधी/ दापोली
नुकत्याच झालेल्या निसर्ग चक्रीवादळाने दापोली तालुक्यात अनेक घरांवर पडलेली झाडे अद्याप जैसे थे स्थितीत आहेत. ती तोडून दूर करण्यासाठी प्रशासनाने सर्वाधिक बाधित ग्रामपंचायतींना 35 वुडकटर विकत घेऊन दिले आहेत.
या चक्रीवादळात दापोली तालुक्यात 997 घरांचे पूर्णपणे तर 18 हजार 808 घरांचे अंशत नुकसान झाले आहे. यातील बहुतांश घरांवरील पत्रे उडून गेल्याने भिंतींचे भिजून नुकसान झाले आहे. केळशी, पाडले, आडे, उटंबर, पाजपंढरी व हर्णे गावांतील घरांची जास्त पडझड झालेली आहे.
सुरुवातीला प्रशासनाने प्रत्येक मंडल अधिकाऱयाला वुड कटर खरेदी करून पुरवले. या कटरच्या सहाय्याने रस्ते मोकळे करण्यावर भर दिला गेला. आता घरांवर पडलेली झाडे दूर करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. गावामध्ये कटर उपलब्ध नसल्याने व गावात कोणीही मजूर काम करायला मिळत नसल्याने अनेक ग्रामस्थांनी घरांवर पडलेली झाडे दूर करण्यासाठी प्रशासनाकडे साकडे घातले आहे. त्यानुसार प्रशासनाने 35 वुडकटरची खरेदी केलेली आहे. हे वूडकटर ग्रामपंचायतींच्या ताब्यात देण्यात आले आहेत. यामुळे आता येत्या काही दिवसांत दापोली तालुक्यातील अनेक घरांवर पडलेली झाडे दूर होतील व प्रत्यक्षात किती नुकसान झालेले आहे हे समोर येईल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.