प्रतिनिधी / दापोली
दापोली शहरातील कावळ्यांना ‘बर्ड फ्लू’चा प्रादुर्भाव झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तरी देखील याची लागण कोंबड्यांना झालेली नसल्याने तूर्तास कोणत्याही प्रकारचे चिकन विक्री व अंडी विक्रीवर बंदी घातली नसल्याचे दापोली नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव रोडगे यांनी स्पष्ट केले आहे.
दापोली शहरातील काळकाई कोंड येथील डम्पिंग ग्राऊंडवर चार दिवसांपूर्वी पाच कावळे मृतावस्थेत आढळून आले होते. देशात सुरु असलेल्या बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर हे पाचही कावळे उत्तर तपासणीकरिता पुणे येथे पाठवण्यात आले होते. सोमवारी त्याचा अहवाल प्राप्त झाला. या पाचही कावळ्यांचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’ने झालेला असल्याचे स्पष्ट झाले. मात्र याचा प्रादुर्भाव अध्याप कोंबड्यांना झालेला नाही. यामुळे वरिष्ठांचे आदेश प्राप्त होईपर्यंत दापोली शहरातील चिकन व अंडी विक्रीवर बंदी नसल्याचे महादेव रोडगे यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे दापोली शहरातील चिकन व अंडी व्यावसायिकांना तूर्तास दिलासा मिळाला आहे.