प्रतिनिधी / दापोली
दापोलीतील कस्टम विभागाने जप्त केलेल्या अडीच हजार किलो गोमासाचे प्रकरण ताजे असतानाच दापोली पोलिसांनी रविवारी रात्री तब्बल 220 किलो गोमास पकडले आहे. हे गोमास देखील मंडणगड येथून दापोलीत आल्याने मंडणगड येथे अजूनही गोवंश हत्या सुरु असल्याचे पुढे आले आहे. यामुळे पुन्हा एकदा खळबळ माजली असून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
दापोली पोलिसांना रविवारी रात्री पेट्रोलिंग दरम्यान काळकाई कोंड परिसरात एका मारुती ओमनी गाडीत 220 किलो गोमास आढळून आले. ही गाडी मंडणगड तालुक्यातील लाटवण येथून दापोलीमध्ये गोमास घेऊन आली होती. याप्रकरणी दापोली पोलिसांनी अल्ताफ पेटकर (48) व जुबेर खलफे (40) या मंडणगड येथील संशयितांना अटक केली आहे. त्यांना मदत करणाऱया मुस्तीद खलीपे व अजमल पेटकर यांचा दापोली पोलिस शोध घेत आहेत.
या प्रकरणी दापोली पोलिसांनी महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 2015 चे कलम 5 (ब), (क) 9 (अ) व मोटर वाहन कायदा कलम 3/ 118, 130, 177, 133, 194 व भादवी 429, 34, 224 प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पूजा हिरेमठ करत आहेत.