प्रतिनिधी / दापोली
दापोली तालुक्यातील अँटिजेन टेस्ट आणि फिव्हर क्लिनिक शहरातील गजबजलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात हलवण्यात आले आहे. प्रशासनाच्या या निर्णयाबद्दल नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत. याआधी टेस्टिंग लॅब युनिट डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या एका बाजूला व जवळपास फार वस्ती व दुकाने नसलेल्या किसान भवन येथे सुरू होते. त्या ठिकाणाहून ते हलवण्यात आले असून नविन ठीकाणी टेस्टिंग करून होम आयसोलेशन केलेल्या काही व्यक्तीही थेट बाजारपेठेत जाण्याची भीती परिसरातील व्यापारी व नागरिकांकडून व्यक्त होऊ लागली आहे. फिव्हर क्लिनिक मध्यवर्ती ठिकाणी असण्यावर कोणाचा आक्षेप नसून अँटिजेन टेस्ट युनिटही येथे हलवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दापोली तालुका प्रशासनाकडून नगरपंचायत प्रशासनाने नव्याने बांधलेली डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील बिल्डिंग अधिग्रहित केली आहे. या ठिकाणी शनिवारी 26 सप्टेंबर पासून फिव्हर क्लिनिक व अँटिजेन टेस्ट लॅब सुरू करण्यात आले आहे. किसान भवन येथील सीसी सेंटर पासून टेस्टिंग युनिट आता स्वतंत्र करण्यात आले आहे. शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेली इमारत नगरपंचायत प्रशासनाने नव्याने बांधली आहे. जुनी ग्रामपंचायत ज्या ठिकाणी होती त्याच ठिकाणी ही इमारत उभी राहिली आहे. दापोली शहरात भर बाजारपेठ परिसरात वर्दळीचे रहदारीचे ठिकाण आहे. त्या ठिकाणी ही अँटिजेन टेस्ट युनिट व फिव्हर क्लिनिक नगरपंचायत प्रशासनाने अधिग्रहण करून देण्यास विरोध करणे गरजेचे होते. एरव्ही यांना ठराव लागतात आता कोणता ठराव झाला? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. दापोली तालुका प्रशासनाने ही बिल्डिंग यासाठी अधिग्रहित करताना यातील धोक्याचा विचार करणे आवश्यक होते. येथून पॉझिटीव्ह व्यक्ती बाजारात फिरल्यास काय परिणाम होतील, याची प्रशासनास माहिती नाही का? याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पध्दतीने आवाज उठवेल व भर बाजारपेठेतील अँटिजेन क्लिनिक व फिव्हर क्लिनिक पुन्हा किसान भवन येथेच नेण्यात यावे, असे मनसेच्या पदाधिकार्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.