प्रतिनिधी/ दापोली
बेकायदेशीररित्या होणाऱया एलईडी फिशिंग, फास्टर बोटी व पर्ससीन नौकांद्वारे होणाऱया फिशिंगविरोधात दापोली, मंडणगड व गुहागर येथील कोळी बांधवांनी तहसील कार्यालयासमोर सुरू केलेले साखळी उपोषण दुसऱया दिवशी मंगळवारीही सुरूच होते.
सोमवार व मंगळवार या दोन दिवसांत उपोषणस्थळी सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱयांनी भेट दिली. शिवाय प्रशासनाच्यावतीने तहसीलदार वैशाली पाटील यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांना उपोषण मागे घेण्याबाबत विनंती केली. मात्र जोपर्यंत ठाम निर्णय होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार कोळीबांधवांनी व्यक्त केला आहे. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.