प्रतिनिधी / दापोली
शहरातील मुलांबरोबर गावातील मुलांनादेखील सैनिकी प्रशिक्षण मिळावे व सुरक्षेसाठी कोणकोणत्या उपाययोजना कराव्या याचे प्रत्येक दिवशीय प्रशिक्षण शिबिर दापोली तालुक्यातील साखळोली येथे नुकतेच पार पडले.
येथील पितांबरी फार्म व मुंबई येथील जय हिंद संस्थेच्या वतीने हे प्रशिक्षण शिबिर पार पडले. यात दापोलीतील मुलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला. या शिबिरामध्ये सैन्यातील माजी अधिकारी महेश नरवडे तसेच आदित्य भावके योगेश बोराटे यांनी मुलांना सैन्याबद्दल माहिती दिली व प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले. यात सुरुवातीला शारीरिक शिक्षणाची माहिती दिली यानंतर मुलांना प्रत्यक्ष रायफल चालवण्याचे प्रशिक्षण दिले यात उभे राहून कसे फायरिंग करावे बसून कसे फायरिंग करावे व जमिनीवर झोपून शत्रूचा अचूक वेध कसा घ्यावा याबद्दल मुलांना प्रशिक्षण देण्यात आले. याच शिबिरात मुलांना धनुर्विद्धेचे देखील प्रशिक्षण देण्यात आले. त्याचप्रमाणे आपल्या बंदुकीतील गोळ्या संपल्या असतील तरीदेखील शत्रूचा कसा खात्मा करावा याबद्दल देखील प्रशिक्षण देण्यात आले.
त्याचप्रमाणे आग लागली पूर आला तर काय करावे जर कोणी पेटवून घेतले असेल किंवा कोण पेटले असेल तर त्याला कसे विझवावे, साप चावल्यावर काय करावे त्याचप्रमाणे प्रथमोपचाराची देखील सखोल माहिती यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आली. सायंकाळ नंतर सर्वांना प्रशस्तीपत्र देखील देण्यात आली. या उपक्रमाला नरेंद्र बगाडे, पराग साळवी, रोहन आंब्रे, सचिन देवरुखकर यांच्यासह पितांबरीच्या अनेक अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.