प्रतिनिधी / दापोली
राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आरंभलेले आंदोलन अधिकाधिक तीव्र होत चालले आहे. त्यातच दापोली आगारातील तब्बल 32 अस्थाई कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीची नोटीस प्रशासनाकडून बजावण्यात आली आहे. ते 24 तासाच्या आत कामावर हजर झाले नाहीत तर शुक्रवारपासून त्यांची सेवा समाप्त करण्यात येणार आहे. यामुळे दापोलीत प्रचंड खळबळ माजली असून बहुजन समाज पार्टीने या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. तसे निवेदन देखील एसटी प्रशासनाला दिले आहे.
दापोली एसटी आगारामध्ये 366 एसटी कर्मचारी कर्तव्यावर असतात. मात्र प्रशासनाने या 356 जणांपैकी केवळ 18 जणांवर निलंबनाची कारवाई केली. शिवाय गुरुवारी दापोली एसटी आगारात रोजंदारीवर कार्यरत असणाऱ्या 32 एसटी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीची नोटीस बजावण्यात आलेली आहे. ते जर शुक्रवार पर्यंत आपल्या कर्तव्यावर रुजू झाले नाही तर त्यांच्यावर काम गमावण्याची कुऱ्हाड कोसळणार आहे. यामुळे दापोलीत प्रचंड असंतोष निर्माण झालेला असून बहुजन विकास पार्टीने आंदोलन करण्याचा इशारा देखील दिलेला आहे.