प्रतिनिधी / दापोली
दापोली तालुक्यातील गिम्हवणे गावातील नागरिक गेले दोन महिने बिबट्याच्या दहशतीखाली वावरत आहेतच. मात्र आता मौजे दापोली परिसरातील नागरिकांनाही बिबट्याच्या दहशतीचा सामना करावा लागत आहे. मौजे दापोली येथील खाकोबा मंदिरा समोर रहाणारे स्वप्नील आणि मनोहर रजपूत यांनी या बिबट्याच्या दहशती बाबत वनविभाग दापोलीकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
त्यानुसार रात्री बारा ते पहाटे पाच च्या दरम्यान वन्यप्राण्यांच्या ओरडण्याचा आवाज व हालचाली ऐकू येत होत्या, मात्र हळूहळू ही श्वापदे घरानजिक येऊ लागली आणि पाच दिवसापूर्वी पहाटे पाचच्या दरम्यान अंगण्यातून त्यांच्या पाळीव कुत्र्यावर झडप घालून जंगलाकडे ओढत नेल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. वन्य प्राणी आणि वाघाच्या संचारामुळे आमच्या कुटुंबात भीतीचे वातावरण पसरले आहे.
असे नमूद करताना, रजपूत यांनी वनविभाग दापोलीकडे या वन्य प्राणी व वाघाचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी लेखी तक्रारी नुसार आग्रही मागणी दाखल केली आहे.