वार्ताहर / टाळसुरे
भारतीय कृषी अनुसंधान परिषद, दिल्ली या कृषी विद्यापीठाच्या शिखर संस्थेकडून जाहीर करण्यात आलेल्या रँकिंग लिस्टमध्ये राज्यातील कोकण विभागामधील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे रँकिंग घसरले आहे. दोन वर्षापूर्वी देशात 32व्या स्थानावर असलेले कृषी विद्यापीठ 2019 ते मार्च 2020 या शैक्षणिक वर्षात चक्क 51 क्रमांकापर्यंत घसरल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
राज्यातील राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ 27 व्या, अकोल्याचे पंजाबराव कृषी विद्यापीठ 38व्या, परभणीचे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ 41व्या क्रमांकावर आहे. कृषी विद्यापीठाचे मानांकन ठरवण्यासाठी गुणांकन आढावा घेतला जातो. विद्यापीठाचे संशोधन क्षेत्रातील काम, मिळवलेली पेटंट, विस्तार शिक्षण क्षेत्रातील कामगिरी, शैक्षणिक क्षेत्रातील गुणवता, विद्यार्थ्यानी कृषी शिक्षण क्षेत्रात व अन्य स्पर्धा परीक्षेत केलेली कामगिरी, रिक्त पदे या सगळ्याचाच आढावा यामध्ये दरवर्षी घेतला जातो. राज्य शासनाकडून पदे भरण्यास मान्यता मिळत नसल्याने रिक्त पदांमुळेही हे गुण कमी झाले आहेत. यानुसार पडताळणी करून रँकिंग निश्चित केले जाते. त्यामुळे आता पुढील वर्षी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या व्यवस्थापनास रँकिंगमध्ये पुन्हा वरचे स्थान मिळवण्यासाठी निश्चितच नव्याने प्रयत्न करावे लागणार आहेत.
बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ शिक्षण संचालक डॉ सतीश नारखेडे यांनी सांगितले की, विद्यापीठाचे घसरलेले रेंकिंग सुधारण्या साठी विशेष प्रयत्न केले जातील जास्तीत जास्त अँन्वाँरमेंटल प्रोजेक्ट आणले जातील, परदेशी विद्यार्थ्यांना प्रवेशा साठी प्रयत्न केले जातील आणि रेटिंग सुधारण्या साठी आवश्यक त्या गोष्टी केल्या जातील असे त्यांनी स्पष्ट केले