प्रशासनाची एकच धावपळ, कोरानाग्रस्त महिलेला मुलगा व सून यांच्यासह रत्नागिरीला हलवले
प्रतिनिधी/ दापोली
तालुक्यात पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण सापडल्यामुळे तालुका प्रशासन हाय अलर्ट झाले आहे. कोणत्याहीप्रकारची धोका न पत्करता सर्वप्रकारची खबरदारी घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे
सोमवारी तालुक्यातील माटवण-नवानगर येथील 65 वर्षिय महिला कोरोना पॉझिटीव्ह आढळली. ही महिला ऑक्टोबर महिन्यामध्ये मुंबई येथे पोटाच्या विकारावर उपचारासाठी गेली होती. तेथे तिने सायन व केईएम आणि एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले. यानंतर तिची प्रकृती पुन्हा बिघडल्याने तिला पुन्हा सायन हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, परंतु तेथे तिला दाखल करून घेण्यास नकार देण्यात आला. यानंतर तिला रुग्णवाहिकेतून दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. यावेळी तिच्यासोबत या महिलेचा मुलगा व सूनही सोबत होती. मुंबई हा रेड झोन असल्यामुळे तेथून आलेल्या इतर रुग्णांप्रमाणे तिचादेखील स्वॅब घेण्यात आला. सोमवारी सायंकाळी तिचा अहवाल प्राप्त झाला. यात ही महिला कोराना पॉझिटीव्ह आढळून आली. यानंतर प्रशासनाची एकच धावपळ उडाली. त्या महिलेच्या संपर्कामध्ये आलेल्यांची यादी तयार करून त्यांना तत्काळ करून क्वारंटाईन करण्यात आले. तसेच या महिलेला तिचा मुलगा व सून यांच्यासह रत्नागिरीला हलवण्यात आले. त्याचप्रमाणे या महिलेच्या संपर्कात आलेल्यांना दापोली येथे क्वारंटाईन करण्यात आले.
या सर्व प्रक्रिया पूर्ण होत असताना मंगळवारी मध्यरात्री नगरपंचायत प्रशासनाकडून उपजिल्हा रुग्णालय पूर्णपणे निर्जंतुकीकरण करण्यात आले. सकाळी उपजिल्हा रुग्णालयातील ओपीडी बंद ठेवण्यात आली होती. उपजिल्हा रुग्णालयाच्या गेटवर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोणताही बाहेरचा रुग्ण तपासणीसाठी रुग्णालयात घेण्यात आला नाही. तसेच जे रुग्ण इतर आजारांसाठी दाखल होते व ज्यांची प्रकृती चांगली झाली होती त्यांनादेखील घरी पाठवण्यात आले. तसेच सर्व वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांना कोणत्याही बाहेरून येणाऱया रूग्णाला तपासायचे नाही अशा सक्त सूचना देण्यात आल्या होत्या.
याचवेळी प्रशासनाने सदर महिला दापोली उपजिल्हा रुग्णालयात आल्यानंतर तिच्या संपर्कात आलेल्या उपजिल्हा रुग्णालयातील प्रत्येक आरोग्य कर्मचाऱयांचे सखोल जाबजबाब घेतले. त्या महिलेला रुग्णालयात आल्यानंतर रुग्णवाहिकेतून कुणी उतरवले, अंब्युलन्समधून स्ट्रेचरवर कोणी ठेवले इथपासून त्या महिलेवर कोणी कोणी उपचार केले, काय काय उपचार केले याची सखोल माहिती प्रशासनाने घेतली. या सर्वांचे जबाब सोशल डिस्टन्स राखून घेण्यात आले. हे जबाब तहसीलदार, पोलीस निरीक्षक व उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक यांच्या उपस्थितीत घेण्यात आले
या घटनेने नगरपंचायत अधिक सावध झाली आहे. शहरात सोमवारी काही दुकाने उघडण्यात आली होती. मात्र अचानक गर्दी वाढल्याने ही दुकाने बंद करण्यात आली. मंगळवारी सकाळी प्रशासनाच्या वतीने रिक्षा फिरवून दवंडी देऊन अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त कोणतेही दुकान उघडायचे नाही अशा सूचना देण्यात आल्या. यामुळे दिवसभर अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. नगरपंचायतीच्या वतीने शहरातील प्रत्येक प्रभागात सर्वे सुरू करण्यात आला आहे. या सर्वेमध्ये मुंबई-पुणे या रेडझोनमधून कोण कोण आलेले आहे, त्यांच्या घरामध्ये किती सदस्य आहेत, त्यांच्या रोजच्या संपर्कात कोण कोण येते याची यादी तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. नगरपंचायतीचे कर्मचारी शहरात घरोघरी जाऊन हे काम करत आहेत. यापुढेदेखील सातत्याने हे काम सुरू राहणार आहे, अशी माहिती नगरपंचायतीचे मुख्याधिकारी महादेव रोडगे यांनी दिली
आज आमदार योगेश कदम दापोलीत
6 मे रोजी आमदार योगेश कदम हे दापोलीत येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये दापोलीचा आढावा घेण्यात येणार आहे. यानंतर ते जिल्हाधिकाऱयांशी चर्चा करून दापोलीमध्ये अन्य काही सेवा सुरू करता येतात का, याची चाचपणी करणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. मात्र शहरात अचानक वाढणारी गर्दी कमी झाली नाही तर अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद ठेवावे लागेल, अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. दापोलीमध्ये ही पहिलीच कोरोना पॉझिटिव्ह महिला आढळून आल्याने प्रत्येक वाहनाची आता कसून चौकशी करण्यात येत आहे. सदर गाडी कुठून आली, कोणत्या कारणासाठी आली, कुणाकडे जाणार व ती गाडी परत कधी जाणार याची नाक्यांवर नोंद करण्यात येत आहे.
तसेच या महिलेचे घर असणाऱया माटवण नवानगर येथील परिसरदेखील सील करण्यात आला आहे. या परिसरात बाहेरून कोणीही व्यक्ती आत जाऊ शकणार नाही व आतील कोणीही व्यक्ती बाहेर जाऊ शकणार नाही अशी सूचना देण्यात आली आहे. सध्या या गावांमध्ये घरोघर जाऊन तपासणीचे काम सुरू करण्यात आले आहे. गावातील ग्रामसेवक व ग्रामपंचायतीला गाव निर्जंतुकीकरण करून घेण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत. तसेच खबरदारीच्या सर्व उपाययोजना आखण्याच्या सूचनादेखील ग्रामपंचायतीला देण्यात आल्या आहेत.
दापोलीतील तळीरामांची गोची
सोमवारी लॉकडाऊन शिथिल होणार या आशेने दापोलीतील तळीरामांनी शहरात एकमेव असणाऱया वाईन शॉपसमोर सकाळपासून गर्दी केली होती. मात्र ही गर्दी पाहून प्रशासनाने वाईन शॉप न उघडण्याचा निर्णय घेतला. यानंतर मंगळवारी तरी वाईन शॉप उघडेल या आशेने अनेक तळीराम पहाटेपासून वाईन शॉपच्या बाहेर रांगा लावून उभे होते. मात्र सोमवारी रात्री दापोलीत कोराना पॉझिटिव्ह महिला आढळून आल्याने दापोलीत केवळ अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. यामुळे मंगळवारीदेखील वाईन शॉप बंद राहिले. यामुळे पहाटेपासून रांगा लावून उभ्या असणाऱया दापोलीतील तळीरामांची घोर निराशा झाली.