सोमवारी होणार 459 उमेदवारांचा फैसला
प्रतिनिधी / दापोली
दापोलीत ग्राम पंचायत मतमोजणीसाठी वहातुकीत बदल केला असुन या साठी निवडणूकची मतमोजणी शहरातील सोहनी विद्या मंदिरमध्ये होणार असल्याने. नर्सरी रोड चर्च जवळ बंद करण्यात येणार आहे. यामुळे नर्सरी रोड वरून जाणाऱ्या विद्यापीठ कर्मचाऱ्यांनी लाल कट्टा येथून बाहेर पडणाऱ्या रस्त्याचा वापर करावा असे आवाहन पोलिसांच्यावतीने करण्यात आले आहे. शिवाय सोहनी विद्यामंदिरकडे आजाद मैदान येथून येणारा जोगनदी पार करून येणारा साकव देखील मतमोजणीच्या वेळी बंद करण्यात येणार आहे. उद्या 459 उमेदवारांचे भवितव्य निश्चित होणार असल्याने संभाव्य वाहतुकीचा अडथळा होऊ नये या साठी पोलिसप्रशासनाने हा वहातुक बदल केला आहे.
मतमोजणी केंद्रात येणाऱ्या ग्रामस्थांनी त्यांची वाहने नर्सरी रोडवर आणू नयेत. त्यांनी वाहने आझाद मैदान येथे उभी करावी व पायी चालत नर्सरी रोड वर यावे. मराठा हॉस्टेल येथे सर्व ग्रामस्थांनी उभे राहून मतमोजणी प्रक्रिया ऐकण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या करिता येथे ध्वनिक्षेपक बसवण्यात आले असल्याची माहिती पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी तरुण भारतशी बोलताना दिली.
आज होणाऱ्या 42 ग्रामपंचायत मतमोजणी करीता दापोलीतील प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. याचा आढावा तहसीलदार वैशाली पाटील व पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी नुकताच घटनास्थळी जाऊन घेतला. यानंतर झालेल्या पत्रकार परिषेत ते बोलत होते.
दापोली तालुक्यामध्ये 15 जानेवारी रोजी 42 ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. याकरिता 106 मतदान केंद्रांवर मतदान झाले. या 106 मतदान केंद्रांवर 106 पोलिस कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. त्याच प्रमाणे 106 मतदान केंद्रांवर मतदार सुरू पार पाडावे याकरिता 474 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. शिवाय 10 टक्के कर्मचारी अतिरिक्त कर्मचारी म्हणून राखीव ठेवण्यात आले होते.
दापोली शहरातील सोहनी विद्या मंदिरमध्ये मतदान झाल्यानंतर सर्व मतदान यंत्रांचाचे संकलन करण्यात आले आहे. तेथेच शासनाच्यावतीने स्ट्रॉंग रूम बनवत तीन दिवस सर्व मतदान यंत्रे सुरक्षित ठेवण्यात आली आहेत.
उद्या 18 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. या मतमोजणीमध्ये मतमोजणीचे आठ राउंड पार पडणार आहेत. या करिता 14 टेबल लावण्यात येणार आहे. सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर दुपारी दोन वाजेपर्यंत सर्व ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर होतील अशी शक्यता तहसीलदार वैशाली पाटील यांनी तरुण भारतशी बोलताना व्यक्त केली.
दापोलीत पोलीसांचा कडक बंदोबस्त
आज 42 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. याकरिता पालघर जिह्यातून दापोली 41 पोलीस कर्मचारी व 2 पोलीस अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच 34 गृहरक्षक दलाचे जवान व 27 स्थानिक पोलिस कर्मचारी आणि अधिकारी या बंदोबस्त करिता नियुक्त करण्यात आलेले आहेत. कोणताही अनुचित पकार घडू नये, या करिता पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जेथे प्रत्यक्ष मतमोजणी होणार आहे. त्या भागाला जणु पोलीस छावणीचे स्वरुप आले आहे.