प्रतिनिधी/ दापोली
रायगड-रोहा येथून दापोली तालुक्यातील शिरशिंगे येथे सेंट्रींगच्या कामासाठी आलेल्या लुईस नामक 30 वर्षीय परप्रांतीय कामगाराचा डोक्यात प्रहार करून निर्घृण खून झाल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकाराने खळबळ उडाली असून पोलीस मारेकऱयाचा तपास घेत आहेत. या प्रकरणी त्याच्या सहकाऱयाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
लुईस हा मूळ ओरिसा राज्यातील रहिवासी असून रोहा येथे भाडय़ाच्या खोलीत राहत होता. तेथे त्याची राजेश बोडरे (50) यांच्याशी ओळख झाली. या ओळखीतून हे दोघेही दापोलीतील शिरशिंगे गावी पिंपळाचा माळ येथील एसआरसिटीमध्ये 7 जानेवारी रोजी सेंट्रींगच्या कामाला रुजू झाले. या ठिकाणी 60 बंगले बांधण्याचे काम सुरू असून त्यांना दररोज 500 रुपये पगार मिळत असे. राजेश बोडरे व लुईस तेथील एकाच बंगल्यात रहायला होते. हे दोघेही एकत्र जेवण करत व दोन खोल्यांमध्ये वेगळे झोपत असत.
दुपारी मद्यप्राशन, रात्री खून
मंगळवारी दुपारी दोघांनी एकत्र मद्यप्राशन केले होते. यानंतर लुईस बाहेर फिरायला गेला. राजेशने त्याची रात्रीपर्यंत वाट पाहिली. मात्र लुईस वेळेत न परतल्याने जेवण करून तो झोपी गेला. सकाळी उठल्यावर त्याला शेजारच्या खोलीत लुईस रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. त्याच्या डोक्याच्या मागे जोरदार प्रहार केल्याचे व रक्ताच्या चिळकांडय़ा भिंतीवर उडाल्याचे त्याच्या निदर्शनास आले.
पोलीस तपासाला वेग
राजेशने एसआरसिटीचे मालक रोशन मोरे यांना ही घटना सांगितली. यानंतर कॉन्ट्रक्टर परशुराम कांबळे घटनास्थळी हजर झाले व त्यांनी पोलीस पाटील प्रभाकर जाधव व त्यांच्यामार्फत दापोली पोलीस स्थानकात ही बाब कळवली. पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक पूजा हिरेमठ, पोलीस अधिकारी मोहन कांबळे, अजित गुजर, सुदर्शन गायकवाड, सागर कांबळे, सुजित तळवटकर यांच्यासह दीपक धोत्रे हे श्री मानाचा गणपती रुग्णवाहिकेसह घटनास्थळी हजर झाले. पोलिसांनी आपला तपास सुरु केला असून लवकरच मारेकरी गजाआड होण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
उत्तरातील विसंगतीमुळे राजेश संशयाच्या फेऱयात
राजेश आणि लुईस हे एकाच छताखाली राहत असताना याचा खून झाल्यावर राजेशला आवाज कसा आला नाही, या बाबत उत्तर देताना त्याच्या जबाबात विसंगती आढळल्याने राजेशला पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे. शिवाय बंगल्याच्या आवारात आढळलेला रक्ताने माखलेला कापूस पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
मृताच्या नातेवाईकांचा शोध सुरु
लुईसचा खून झाल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. यानंतर पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी लुईसचा पूर्ण पत्ता व नातेवाईकांचा तपास घेण्यासाठी रोहा व रायगड पोलिसांसह ओरिसातही याची माहिती कळविली आहे. त्याच्या नातेवाईकांशी लवकरच संपर्क होण्याची आशा राजेंद्र पाटील यांनी व्यक्त केली आहे.
परप्रांतीयांची माहिती ठेवण्याकडे दुर्लक्ष
शिरशींगे गावामध्ये मोठय़ा प्रमाणात परराज्यातील कामगार आहेत. परराज्यातील व अनोळखी कामगार ठेवताना त्याचा फोटो व पूर्ण माहिती ठेवण्याबाबत येथील सर्व फार्म मालकांना वेळोवेळी कळवले आहे. मात्र त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याची खंत पोलीस पाटील प्रभाकर जाधव यांनी व्यक्त केली.
अन्य सहकारी निवडणुकीसाठी गावी
लुईस व राजेश या दोघांच्या समवेत अन्य दोन कामगार व कॉन्ट्रक्टर परशुराम कांबळे हे देखील याच ठिकाणी राहत असत. हे सर्वजण रोहा येथील आहेत. मात्र ग्रामपंचायतीच्या निवडणूक व मतमोजणीच्या निकालासाठी ते गावी गेले होते. त्यामुळे लुईस व राजेश हे दोघेच बंगल्यात राहत होते.