विरोधक सूस्त, काही नावांची केवळ चर्चा, भाजपासाठी सध्या तरी दिलासादायक चित्र
प्रतिनिधी /वास्को
दाबोळी मतदारसंघ दक्षिण गोव्यातील एकमेव मतदारसंघ असावा ज्या ठिकाणी भाजपाला विरोधी पक्षाचा सामना करावा लागत नाही आणि पक्षांतर्गंत कुरबुरीही नाहीत. या मतदारसंघात भाजपाला पक्षांतर्गंत स्पर्धा नाही. मागच्या साडे चार वर्षांत मंत्री माविन गुदिन्हो यांचाच दाबोळीत एकतर्फी अमल राहिलेला आहे. राजकीयदृष्टय़ा फारच शांत वातावरण असलेला हा मतदारसंघ निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे विरोधी नेत्यांच्या अभावामुळे फारसे जाणवत नाही. या मतदारसंघात काही ईच्छुक उमेदवारांची चर्चा हल्ली होऊ लागलेली आहे. मात्र, मंत्री माविन गुदिन्हो यांना टक्कर देऊ शकणारा उमेदवार विरोधकांना लाभेल काय असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे. सध्या तरी भाजपाला या मतदारसंघात दिलासादायक चित्र आहे.
यंदा दाबोळी मतदारसंघात मंत्री माविन गुदिन्हो यांच्या विरोधात उमेदवार कोण असेल हा प्रश्न सध्या तरी लाख मोलाचा बनलेला आहे. मागच्या दोन निवडणुकांमध्ये महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने दाबोळीत आपले अस्तित्व दाखवले होते. मागच्या साडे चार वर्षांत मात्र, या पक्षाचे संघटन फिसकटल्याचे जाणवत आहे. 2012 पासूनची धडपड, तो आवेष, ते समाजकार्य व पक्ष कार्य कुठेही जाणवत नाही. काँग्रेस पक्षही दाबोळीत गलीतगात्र झालेला आहे. त्यांचेही काहीच कार्य जाणवत नाही. ते निवडणुकीचीच वाट पाहात असावेत असे दिसते. काँग्रेसची एकगठ्ठा मते या मतदारसंघात आहेत. कार्यकर्ते व नेतेही आहेत. परंतु भाजपाच्या गतीमान राजकारणापुढे त्यांनी हात टेकलेले आहेत. काहींना उघडपणे बोलणे वागणे धोक्याचे वाटते. उघडपणे पुढे येण्यासाठी निधीचीही चणचण अनेकांना भासते. अशा काही कारणामुळे दाबोळीत विरोधक सुस्त आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, गोवा फॉरवर्ड किंवा अन्य पक्षांचे अस्तित्व या मतदारसंघात शून्यच आहे. मात्र, ऐन निवडणुकीत अनेक पक्षांचे उमेदवार उभे ठाकतील यात संशय नाही. काही नावांची सुप्त चर्चा होऊ लागलेली आहे.
नव्या दाबोळीचे पहिले आमदार ठरले माविन गुदिन्हो
मुरगाव तालुक्यात 77 साली दाबोळी मतदारसंघाची निर्मिती झाली होती. मगो सरकारमधील कायदामंत्री स्व. शंकर लाड या मतदारसंघात प्रथम जिंकून आले होते. 1980 मध्ये दाबोळी मतदारसंघात ऍड. हेलकुरान दोरोदो हे काँग्रेसतर्फे जिंकून आले. त्यानंतर 1984 साली स्वा. सायमन डिसोजा काँग्रेसतर्फे निवडून आले. गोव्याला घटक राज्याचा दर्जा मिळाल्यानंतर मुरगाव तालुक्यात कुठ्ठाळी, वास्को आणि मुरगाव असे तीन मतदारसंघ निर्माण झाल्यामुळे दाबोळी मतदारसंघाचे अस्तित्व मिटले. मात्र, 2012 सालच्या निवडणुकीपूर्वी झालेल्या मतदारसंघांच्या पुनर्रचनेत दाबोळी मतदारसंघाचा नव्या स्वरूपात उदय झाला. चिखली व चिकोळणा बोगमाळो हे पंचायत क्षेत्र आणि मुरगाव पालिका क्षेत्रातील शेवटच्या पाच प्रभागांचा समावेश दाबोळी मतदारसंघात करण्यात आलेला आहे. नव्या दाबोळी मतदारसंघाचा उदय होताच, कुठ्ठाळीत चार वेळा काँग्रेसतर्फे निवडून आलेल्या माविन गुदिन्हो यांनी कुठ्ठाळीला सोडचिट्टी देऊन दाबोळीत प्रवेश केला. या मतदारसंघात 2012 साली ते निवडून आले. आणि मागच्या निवडणुकीत भाजपात प्रवेश करून ते दाबोळीत मतदारसंघात भाजपाचे आमदार बनले.
राजकीय विरोधक नाहीत आणि पक्षांतर्गंत कुरबुरीही नाहीत, दाबोळीत मंत्री माविन गुदिन्हो यांचाच अमल
दाबोळी मतदारसंघ तसा मंत्री माविन गुदिन्हो यांना लकी ठरलेला आहे. काँग्रेसचे आमदार असतानाही त्यांना दाबोळीत पक्षांतर्गंत स्पर्धा नव्हती आणि आता भाजपातही त्यांना पक्षांतर्गंत स्पर्धा नाही. उमेदवारीसाठी कुणी दावेदार नाही किंवा दाबोळीत पक्षांतर्गंत कुरबुरीही नाहीत. मागच्या साडे चार वर्षांत तर त्यांचा दाबोळीत एकतर्फी अमल राहिलेला आहे. प्रत्येक मतदारसंघात आमदार किंवा मंत्र्यांना राजकीय विरोधक असतात. मात्र, दाबोळी हा दक्षिण गोव्यातील बहुदा एकमेव मतदारसंघ असावा जीथे राजकीय विरोधकांचे अस्तित्वच जाणवत नाही. त्यामुळे राजकीय विरोधकांकडून होणारी डोके दुखी माविन गुदिन्हो यांच्या वाटय़ाला आलेली नाही. दाबोळीत पक्ष संघटनेवरही त्यांचे पूर्ण नियंत्रण आहे. त्यामुळे कुणाची नाराजी, कुरबुरीही असा प्रकारही त्यांच्या वाटय़ाला नाही. मतदारसंघात विरोधक क्षीण आहेत ही राजकीयदृष्टय़ा त्यांची जमेची बाजू. सध्या दाबोळीतील राजकीय वातावरण ज्या परिस्थितीत आहे, ही परिस्थिती अशीच राहिल्यास मंत्री माविन गुदिन्हो दाबोळीत हॅट्रीक साध्य करू शकतात. पुढील सहा महिन्यात दाबोळीचे राजकीय वातावरण कितपत बदलतेय हे पहावे लागेल.
2017 नंतर मगो आणि काँग्रेसचे दाबोळीतील अस्तित्व क्षीण
2012 साली झालेल्या दाबोळीतील पहिल्या निवडणुकीत मगो भाजपाची युती झाली होती. त्यावेळी काँग्रेसविरोधी परीवर्तनाच्या लाटेत मगो पक्षाला या मतदारसंघात बाजी मारण्याची संधी चालून आली होती. मात्र, मगो पक्षाच्या नेत्यांनी निवडणुकीला जेमतेम पंधरा दिवस शिल्लक असताना उमेदवाराला रिंगणात उतरवीले. त्यामुळे हा पक्ष निवडणुक तयारीत कमी पडला आणि काँग्रेसला दाबोळी राखता आली. माविन गुदिन्हो यांचा या निवडणुकीत मगो पक्षाचे उमेदवार प्रेमानंद नाणोस्कर यांच्याविरूध्द केवळ 944 मतांनी विजय झाला. प्रेमानंद नाणोस्कर हे उमेदवार त्यावेळी नवखे होते. तरीही परीवर्तनाच्या लाटेत ते विजयाच्या समीप गेले. मगो पक्षाला पराभवाची सल बोचत राहिली. पुढच्या वेळी दाबोळी जिंकायचीच असा चंग मगो पक्षाने बांधला. नवा हुरूप घेऊन दाबोळीत मगो पक्ष कामाला लागला. या मतदारसंघात संघटन तयार केले. सतत पाच वर्षे त्यासाठी दाबोळी मतदारसंघात प्रेमानंद नाणोस्कर यांनी कार्यकर्त्यांची मोट बांधून पक्ष कार्य केले. मात्र, 2017 ची निवडणुक जवळ येता येता राजकीय चित्र पूर्णपणे बदलले होते. मगो भाजपाची युती फिसकटली होती. ऐवढेच नव्हे तर दाबोळीतील मगो पक्षाचे प्रतिस्पर्धी माविन गुदिन्हो यांनी काँग्रेसला सोडचिट्टी देऊन थेट भाजपाच्या उमेदवारीवर निवडणुक लढवणे पसंद केले. माविन गुदिन्हो यांच्या या कृतीमुळे एका बाजुने काँग्रेस क्षीण झाली. तर दुसऱया बाजुने युती नसल्याने मगो पक्षही क्षीण झाला. परीणामी भाजपातर्फे माविन गुदिन्हो यांनी 7234 मते प्राप्त केली. तर मगोतर्फे प्रेमानंद नाणोस्कर यांनी 4740 मते प्राप्त केली. माविन गुदिन्हो यांनी 2494 मतांच्या फरकाने दाबोळीत दुसऱयांदा विजय प्राप्त केला. विजयाची अपेक्षा ठेवलेल्या मगो पक्षाचा या निवडणुकीत मोठय़ा फरकाने झालेल्या पराभवामुळे हिरमोड झाला. त्यावेळी गळालेले अवसान मगो पक्षासह काँग्रेस पक्षालाही पुन्हा प्राप्त करता आलेले नाही. दाबोळीत विरोधक अस्तित्वहीन आहेत. हे चित्र दाबोळीत भाजपासाठी दिलासादायक आहे.
सहा महिन्यांत मंत्री माविन गुदिन्हो यांच्या विरोधात सक्षम उमेदवार मिळेल काय ?
मागच्या निवडणुकीत दाबोळी मतदारसंघात काँग्रेस तिसऱया स्थानावर होती. माविन गुदिन्हो या निवडणुकीत भाजपाबरोबरच काँग्रेसची मते खेचण्यातही यशस्वी ठरले होते. मात्र, यंदा भाजपाला निव्वळ भाजपाच्याच मतांवर अवलंबून राहावे लागणार आहे. क्रॉस वॉटींग फारच कठीण ठरणार आहे. भाजपाविरोधी मतांचे ध्रुवीकरण होऊ नये यासाठी राजकीय खलबते जशी सगळीकडेचे तेजीत आहेत. तशी दाबोळीतही होऊ लागलेली आहेत. या भाजपा विरोधकांचे उमेदवार मात्र अद्याप सूस्त आहेत. विजयी व्हायचे असेल तर ऐवढय़ातच तयारीला लागण्याची गरज होती. मात्र, विरोधकांची तशी तयारी अद्याप नाही. दुसऱया बाजुने मंत्री माविन गुदिन्हो निवडणुकीला पूर्णपणे सज्ज आहेत. विरोधकांचा गर्भगळीतपणा त्यांना लाभदायक ठरण्याची दाट शक्यता आहे. मंत्री माविन गुदिन्हो हे मागच्या चाळीस वर्षांपासून राजकारणात आहेत. सहा वेळा ते आमदार बनलेले आहेत. अनेक वेळा मंत्री बनलेले आहेत. निवडणुक जिंकण्याचा दिर्घकाळचा राजकीय अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे विरोधी पक्षांना दाबोळीत माविन गुदिन्हो यांच्या सारखा तोडीस तोड उमेदवार देणे शक्य होईल काय असा प्रश्न उपस्थित होते. विजयी व्हायचे असेल तर माविन गुदिन्हो विरोधी उमेदवार शुल्लक असणार नाही याची काळजी राजकीय पक्षांना घ्यावी लागेल. गेली चाडेचार वर्षे सूस्त राहिलेल्या विरोधकांना येत्या सहा महिन्यांत माविन गुदिन्हो यांच्या विरोधात सक्षम उमेदवार देणे शक्य होईल काय असा प्रश्न चर्चिला जात आहे.
प्रेमानंद नाणोस्कर अद्याप उत्सुक, जुझे फिलिप यांच्यासह गोंयचो आवाजही चर्चेत
दाबोळीत सध्या काँग्रेसचे उमेदवार म्हणून कुणाचेही नाव चर्चेत नाही. मगो पक्षाचे मागील निवडणुकीतील उमेदवार प्रेमानंद नाणोस्कर यांच्याही नावाची चर्चा नाही. नुकत्याच पार पडलेल्या पालिका निवडणुकीतही त्यांना अपयश आले. परंतु पक्षाने आपल्याला दाबोळीतून पुन्हा उमेदवारी दिल्यास आपण निवडणुक लढवीन. आपण समाजकार्य सोडलेले नाही आणि राजकारणही सोडलेले नाही. पक्षाच्या नेत्यांच्या आपण संपर्कात आहे. कोविडमुळे राजकीय हालचालींवर निर्बध आलेले आहेत. वातावरणात सुधारणा झाल्यावर पुन्हा कामाला लागेन असे प्रेमानंद नाणोस्कर यांनी म्हटले आहे. पर्यावरण जतनासाठी कार्य करणारे व गोंयचो आवाज या राजकीय पक्षाचे निमंत्रक कॅप्टन वॅरियेतो फर्नांडिस यांचेही नाव दाबोळीतील उमेदवार म्हणून चर्चेत आहे. तिसरे नाव आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष व माजी महसुलमंत्री जुझे फिलीप डिसोजा यांचे. आतापर्यंत वास्कोतून सात वेळा निवडणुक लढवलेले व दोन वेळा आमदार मंत्री बनलेले जुझे फिलिप डिसोजा यंदा दाबोळीतून निवडणुक लढवतील अशी सुप्त चर्चा आहे. मात्र, जुझे फिलिप यांनी या चर्चेला थेट होकार दिलेला नाही. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आताच्या दाबोळीतील बराच भाग पूर्वी वास्को मतदारसंघात होता. त्या भागातून आपण दोन वेळा निवडून आलो आहे. त्यामुळे आपण तीथे निवडणुक लढवावी असे दाबोळीतील काही लोकांना वाटते. मात्र, आपण तसा निर्णय घेतलेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या एकूण परिस्थितीत मंत्री माविन गुदिन्हो यांना दाबोळीत आव्हान कोण देणार हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरीत आहे. त्यामुळे मंत्री माविन गुदिन्हो निर्धास्त आहेत.