प्रतिनिधी /वास्को
दाबोळीतील चौपदरी महामार्गावर झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. मयत दुचाकीस्वाराचे नाव सत्यप्रकाश यादव(21) असे असून तो हेडलॅण्ड सडय़ावरील एमपीटी वसाहतीमध्ये राहणारा आहे. शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास नव वर्षाच्या स्वागताची धामधुम सुरू असतानाच हा अपघात घडला.
गुरूवारी रात्री कार अपघातात तिघां युवकांचा दुर्दैवी अंत झाला होता. या भिषण अपघाताला चोवीस तास उलटण्या अगोदरच पुन्हा अपघातात दुचाकी स्वार ठार झाला. मिळालेल्या माहितीनुसार मयत युवक आपल्या पल्सर दुचाकीवरून वास्कोच्या दिशेने येत होता. आपल्या वाहनावरील त्याचे नियंत्रण गेल्याने त्याने प्रथम एका कारला ठोकरले. त्यानंतर तो रस्त्यावर फेकला जाऊन दुचाकीसह रस्ता दुभाजकावर आदळला व जागीच ठार झाला. आल्त दाबोळी येथील नौदलाच्या डेपोजवळ हा अपघात घडला. वेर्णा पोलिसांनी या अपघाताचा पंचनामा केला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.