प्रतिनिधी / वास्को
दाबोळी विमानतळावरील एका टॅक्सी चालकाला मारहाण करून त्याला रक्तबंबाळ करण्याची घटना बुधवारी संध्याकाळी घडली. व्यवसायीक वैमनस्यातून ही मारहाण झालेली असून वास्को पोलिसांनी या प्रकरणी मांगोरहिल भागातील चौघां युवकांना अटक केली आहे.
दाबोळी विमानतळापासून अवघ्या काही अंतरावरील महामार्गावर ही घटना घडली. जखमी टॅक्सी चालकाचे नाव गुरूदास कांबळी असे असून तो विमानतळावरील युनायटेड टॅक्सीमेन्स युनियनचा सदस्य आहे. त्याने आपली टॅक्सी विमानतळाबाहेरील रस्त्यावर पार्क केली होती. ती विमानतळ आवारात घेऊन जाण्यासाठी तो खाली रस्त्याजवळ आला असता, त्याच्यावर काही युवकांनी हल्ला केला. हल्ला करणारे सर्वजण दाबोळी विमानतळावरील प्रवाशांची बेकायदा वाहतुक करणारे असून त्यांना विमानतळावर कायदेशीररीत्या व्यवसाय करता येत नाही. त्यामुळे हे चालक महामार्गावर गाडय़ा पार्क करून बेकायदा व्यवसाय करीत असतात. या बेकायदा व्यवसायामुळे विमानतळावर कायदेशीररीत्या टॅक्सी काऊन्टरवरून व्यवसाय करणाऱया टॅक्सी व्यवसायीकांना फटका बसत असल्याने ते बेकायदा व्यवसायाविरूध्द पोलिसांकडे तक्रारी करीत असतात. त्यामुळे गेले काही दिवस पोलिसांकडून त्यांच्याविरूध्द कारवाई होत आहे. बुधवारी दुपारी याच कारणावरून बेकायदा व्यवसाय करणाऱयांनी टॅक्सी व्यवसायीकांशी हुज्जत घालायला सुरवात केली होती. त्यानंतर संध्याकाळी याच रागातून एकटा सापडलेल्या टॅक्सी चालकालावर हल्ला करण्यात आल्याचा आरोप टॅक्सी व्यवसायीकांकडून होत आहे. या बेकायदा व्यवसाय करणाऱयांकडून टॅक्सी व्यवसायीकांना दमदाटी करण्याचे प्रकार सतत घडत असल्याचे युनायटेड टॅक्सीमेन्स युनियनने म्हटले आहे. जखमी टॅक्सी चालकाला गोमेकॉमध्ये दाखल करण्यात आले आहे.
या मारहाणीच्या घटनेची माहिती मिळताच युनायटेड टॅक्सीमेन्स युनियनचे विमानतळावरील सर्व चालक व मालक एकत्र आले व त्यांनी या मारहाणीत गुंतलेल्या सर्वांना अटक करण्याची मागणी केली. पोलिसांनी रात्री इम्रान शेख, अल्लाबक्ष, राजा व राजेश लमाणी या चौघांना अटक केली. याच मागणीसाठी रात्री उशिरापर्यंत युनायटेड टॅक्सीमेन्स युनियनचे पदाधिकारी व सदस्य मोठय़ा संख्येने पोलीस स्थानकासमोर ठाण मांडून होते. पोलीस निरीक्षक निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली वास्को पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, दाबोळी विमानतळ आवारात व आवाराबाहेर बेकायदा टॅक्सी व्यवसाय वाढत असून यासंबंधी वादावादीच्या घटना व दमदाटीचे प्रकार रोजच घडत आहेत. यासंबंधी पोलिसांकडे वारंवार तक्रारीही दिलेल्या आहेत.हे प्रकार कायमचे रोखण्यासाठी दाबोळी विमानतळ आवाराची व मुख्य प्रवेश व्दारापर्यंतची सुरक्षा व्यवस्था केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या हाती सोपवणे योग्य होणार आहे. व्यवसायासाठी विमानतळ आवारात प्रवेश करणाऱया अनधिकृत व्यक्तींवर अशा सुरक्षेमुळे रोख येईल असे युनायटेड टॅक्सीमेन्स युनियने म्हटले आहे.